काफिले
‘‘माझ्या अतिशय आदरणीय आणि नामवंत इतिहास शिक्षकांना कोर्टात खेचण्याची संधी मला मिळाली तर मी जरूर खेचेन...! असं म्हणतोय म्हणून गैरसमज करून घेऊ नका. ते अतिशय चांगले शिक्षक होते. त्यांचं ज्ञान वादातीत होतं आणि प्रामाणिकपणा संशयातीत होता. प्रश्न फक्त एवढाच होता, की ते इतिहासाकडं व्यक्ती आणि घटनांची एक लांबलचक आणि कंटाळवाणी साखळी म्हणून पाहत होते. त्यांचं शिकवणं म्हणजे इतिहासातल्या राजे आणि राण्या यांच्या आयुष्यांची केवळ उजळणी होती. त्यात केवळ लढाया आणि विविध क्रांती यांची जंत्री होती. त्या तुलनेत आज आपण इतिहासाकडं विस्तृत दृष्टिकोनातून पाहतो. मी आणि आमच्या सगळ्या वर्गानं तो विषय तसाच समजून घेतला. काही असो... इतिहास मला आवडतो. कारण, इतिहासावर माझं प्रेम आहे. खूप वर्षांनंतर भुवनेश्वर विमानतळावर माझ्या शेजारी पान चघळत बसलेल्या एका व्यापाऱ्यानं इतिहासातल्या सौंदर्याकडं पाहण्याची एक वेगळीच दृष्टी मला दिली. तीच ही कहाणी... *** खूप वर्षांपूर्वी दिल्लीला जाण्यासाठी माझ्या विमानाची वाट बघत मी भुवनेश्वर विमानतळावर एका अरुंद बाकावर बसलो होतो. विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला होता. तिथ...