महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती आणि भाषासंबंधी- 
'महाराष्ट्र’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि त्याचा अर्थ यांबद्दल विद्वानांत एकमत नाही. प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये दक्षिणापथ या संज्ञेचा वापर जास्त आढळून येत असून नर्मदेचा दक्षिण तीर ते कन्याकुमारी एवढ्या मोठ्या भागाचा दक्षिणापथ असा निर्देश केला जात असे. सातवाहनांच्या शिलालेखांत दक्षिणापथाचा उल्लेख येतो. यावरून असे दिसते की, महाराष्ट्र या संज्ञेचा वापर नंतरच्या काळामध्ये सुरू झाला असावा.
* इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकांमध्ये महाराष्ट्र या संज्ञेचा आढळ पहिल्यांदा दिसून येतो. ‘महाराठी' या शब्दाचा वापर सातवाहनांच्या लेखांत, त्याचप्रमाणे त्यांच्या उत्तरकाळातील काही नाण्यांवर आढळून येतो. महावंस या बौद्धग्रंथात ‘महारठ्ठ’ या शब्दाचा उल्लेख आहे. या ग्रंथातील निर्देशानुसार बौद्ध भिक्षू मोगली पुत्र तिस्स याने इ.स.पू. तिसऱ्या शतकात महिसमंडळ, बनवासी, अपरांतक, महारठ्ठ येथे बौद्ध धर्मोप्रदेशक पाठविले होते. यावरून महारठ्ठ हे नाव इ.स.पू. तिसऱ्या शतकापासून रूढ असावे. रविकीर्तीच्या लेखात चालुक्यवंशीय दुसरा पुलकेशी हा तीन महाराष्ट्रकांवर राज्य करीत होता, असे उल्लेखिलेले आहे.
* वररूचीने महाराष्ट्र हे दक्षिणपथातील विशिष्ट प्रदेशाला प्राकृत भाषेचे नाव दिले आहे. वररूचीच्या नंतर ‘महाराष्ट्री’ हाच उल्लेख शकनृपति श्रीधर वर्मा यांच्या चौथ्या शतकातील म्हणजे इ.स. ३६५ साली अस्तित्वात असलेल्या ‘एरण’ येथील स्तंभलेखात सापडतो. (संशो. मुक्ता १.१५९ - डॉ. मिराशी) यांचे आहे. श्रीधर वर्मा यांचा (सेनापती सत्यनाग आपणास ‘महाराष्ट्र’ म्हणजे महाराष्ट्रीय म्हणवितो - सेनापती सत्यनागेन प्रमुखेन महाराष्ट्रीय - ओ. ६.७) हा लेख असलेली यष्टी - श्रीधर वर्मा याने एरण येथे उभारली. ती धाराशयी पडलेल्या नाग सैनिकांच्या स्मरणार्थ महाराष्ट्राविषयीचे हे सर्व प्राचीन उल्लेख पाहू जाता असे अनुमान निघते की, उपरोक्त उल्लेखिलेल्या महाराष्ट्रात प्राचीन काळी हट्टी किंवा हाट लोकांची वसती असावी. त्यामुळे हट्टदेश असे नाव मिळाले असावे. मरहट्ट या शब्दातील हट्ट या घटक शब्दाने हट्टीलोक सूचित होत असे मत श्री. शं. बा. जोशी मर्‍हाटी संस्कृती प्र.१ यांनी अलीकडल्या काळात व्यक्त केले. त्याचे खंडन डॉ. मिराशी यांनी दिलेल्या एरणातील सेनापती सत्यनागाच्या स्मरणार्थ उभारलेल्या दृष्टीच्या संदर्भामुळे शं.बा. जोशींचा युक्तिवाद लटका ठरतो.
* तद्नंतरचा महाराष्ट्राचा उल्लेख - बौद्धग्रंथ महावंस्ते यात सापडतो. हा ग्रंथ पाचव्या शतकातील असून त्यात मोगलीपुत्त तिष्य याने ‘थेर’ म्हणजे श्रेष्ठ धर्मोपदेशकांना ज्या निरनिराळ्या देशांत धर्मप्रचारासाठी धाडले होते. ‘महारट्ट’ प्रदेशाचा उल्लेख आहे. या महारट्टात धर्मप्रचारासाठी जो गेला त्या बौद्ध धर्मोपदेशकाचे नाव आहे महाधम्म रखिता (महावंसो १२) वराहमिहिराने ‘बृहत्संहिते’त महाराष्ट्राविषयी म्हटले आहे ते असे - ‘भाग्य’ रसविक्रयिण: पष्यस्त्री कन्यका महाराष्टा: (बृहत्संहिता १०.८) ऐहोळे शिलालेखात (इ.स. ६३४) सत्याश्रय पुलकेशी (चालुक्य) हा तिन्ही महाराष्ट्राचा सार्वभौम राजा झाल्याचा उल्लेख सापडतो. (एप्रि. इं. ६.४) या त्रिमहाराष्ट्राच्या कल्पनेवरून पुढे १५ व्या शतकात महानुभाव ग्रंथकार - गुर्जर शिवबास या ग्रंथकारानी ‘तीन भाग मर्‍हाट’ असल्याचे आपल्या ग्रंथात नमूद केले. इ.स. ६२९ ते ६४५ या काळात चिनी प्रवासी हुएनत्संग याने याच प्रदेशास ‘मोहोलाश’ म्हणून संबोधिले होते.
* डॉ. भांडारकरांच्या मते महाराष्ट्राचे नामकरण राष्ट्रीक किंवा रट्ट नावाच्या लोकांवरून झाले असून या मतास थोडेफार ऐतिहासिक प्रमाण मिळते ही गोष्ट खरी आहे. नाणेघाट, भाजे, कार्ले व कान्हेरी येथील शिलालेखात ‘महारठिनी’ व ‘महारठी’ अशी अनुक्रमे स्त्री-पुरुषवाचक विशेषणे आढळतात. नाणेघाट शिलालेख (म्प्. ऐंघ्, ५.५९) क्र. ६ यात ‘महारठिगणकहिरी’ असा स्पष्ट उल्लेख आहे. भाजे व घेडसे येथील लेखातही अनुक्रमे ‘महारठिस कोसकीपुतस विण्हुदतस’ व ‘महामोय बालिकाय महादेविय महारठिनिय’ असे उल्लेख आढळतात. २ वरील सर्व उल्लेख देश व लोक यांचे वाचक आहेत, यात संशय नाही. प्रश्‍न त्यातील ‘महारठि’ या शब्दाच्या अर्थाविषयी आहे. तो शब्द जाती किंवा लोकवाचक असावा ही उपपत्ती व्यवस्थित बसते; परंतु महारठि हा महारथी या शब्दाचा अपभ्रंश असल्यास मात्र अनवस्था संभवते. त्यामुळे म. काणे यांना वरील मत मान्य नसून महाराष्ट्र या शब्दाचा दर्शनी अर्थ घेऊन ‘महान् राष्ट्र ते महाराष्ट्र’ अशी उपपत्ती त्यांनी मांडली आहे. (वि. विस्तार, व. ४९).
* महानुभाव पंथातील चक्रधरोक्त सूत्रपाटाचा १५व्या शतकातील एक भाष्यकार गुर्जर शिवबास ‘महाराष्ट्री असावें’ या सूत्रावर लिहिताना ‘महंतराष्ट्र म्हणौनि महाराष्ट्र’ अशी व्याख्या करतो. हाच भाष्यकार पुढे ‘गडी सिडीं असावें’ या सूत्रावर भाष्य करताना म्हणतो, ‘‘सेवट मणिजे श्रीन्नर जुन्नर कल्याण खांदार : तीन भाग मर्‍हाठ : तो सेवट -’’ इ.स. ६३४ तील ऐहोळे लेखातही महाराष्ट्र हा तीन घटकांचा मिळून बनल्याचा उल्लेख आहे. ही घटकांची किंवा खंडांची कल्पना १७ व्या शतकातील ‘आचारपद्धति’ नामक महानुभाव ग्रंथातही जागृत दिसते. त्यातील उतारा असा - ‘‘देश मणिजे खंडमंडळ : जैसे फलेठाणापासौनि दक्षिणेसि : मर्‍हाठी भाषा जेतुला ठाई वते तेतुलें एक मंडळ : तयासि उत्तरे बालेघाटाचा सेवट : ऐसें एक खंडमंडळ : मग उभे गंगातीर तेंहि एक खंडमंडळ : आणि तयापासौनि मेघकरघाट (मेहकर, जि. अकोला) ते एक खंडमंडळ : तयापासौनि आवघें वराड ते एक खंडमंडळ : परि आवघीं मिळौनि महाराष्ट्रचि बोलिजे : किंचित् किंचित् भाषेचा पालट : मणौनि खंडमंडळें मणावीं’’ (नेने : चक्रधर - सिद्धांतसूत्रे, उपोद्घात, पृ. २).
१. महार व महाराष्ट्र यांच्यातील संबंध सूचित करणारे पुढील वाक्य ‘लीळाचरित्रा’च्या एका पोथीत सापडते. ‘तुझेया महाराचा महाराष्ट्र होउनि मीचि जातु असे.’ वरील वाक्य महाराष्ट्राचा त्याग करताना मायिता हरीच्या तोंडी आहे. (कोलते : श्रीचक्रधर - चरित्र, परिशिष्ट १)
२. महानुभाव कवी डिंम कृष्णमुनी तत्कालीन महाराष्ट्राचा विस्तार पुढीलप्रमाणे सांगतो :- ‘‘विंध्याद्रीपासौनि दक्षिण दिशेसी : कृष्णानदीपासौनि उत्तरेसी : झाडी मंडळापासौनि पश्‍चिमेसी : महाराष्ट्र बोलिजे:’’
* जॉन विल्सन यांनी मोल्सवर्थच्या कोशात महाराष्ट्र म्हणजे महार+राष्ट्र = महारांचे राष्ट्र अशी एक लोकवाचक व्युत्पत्ती सुचविली आहे. महाराष्ट्रात महार वस्ती पुष्कळ असल्याने हे नाव पडले असावे. ओपर्ट हेही ह्या व्युत्पत्तीशी सहमत दिसतात. मात्र येथे महार शब्दाच्या व्युत्पत्तीचे विश्लेषण दिलेले नाही. लोकांच्या नावावरून प्रदेशास नाव दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. टॉलेमीने महारांना ‘परवारी’ असे म्हटले आहे. ते आर्य संस्कृतीच्या कक्षेबाहेरचे असून तेसुद्धा मराठ्यांना आर्य म्हणून ओळखतात. आर्यला कानडीमध्ये ‘आरे’ असे संबोधले जाई. यावरून ‘अरिअके’ असे या प्रदेशाला म्हटले असावे. एरियन याने आपल्या इंडिका ग्रंथात मराठ्यांच्या प्रदेशास अरियके असे संबोधले आहे.
* अशोकाच्या शिलालेखात दक्षिणेतील रट्ट लोकांनाच रास्टिक असे म्हटले असून त्याचेच संस्कृत रूप ‘राष्ट्रिक’ झाले, असे रा. गो. भांडारकर यांनी आपल्या अर्ली हिस्टरी ऑफ द डेक्कन या दख्खनच्या प्राचीन इतिहासविषयक ग्रंथात म्हटले आहे. अशोकाच्या शिलालेखात एके ठिकाणी ‘महाभोज’ असा उल्लेख आहे. जसे भोज लोक स्वतःला महाभोज म्हणवून घेत, तसेच या प्रदेशात रहाणाऱ्या राष्ट्रिकांनी स्वतःला महाराष्ट्रिक किंवा ‘महारट्ट’ असे म्हणवून घेतले आणि ते ज्या देशात रहात, त्या देशाला महारट्ट व संस्कृतमध्ये महाराष्ट्र असे नाव पडले.
* राजारामशास्त्री भागवत यांच्या मते संस्कृत नाटकांमध्ये येणारा ‘मरहठ्ठ’ हा जनवाचक शब्द ‘मऱ्हाठा’ शब्दाची प्रकृती दिसतो. ‘मऱ्हाठा’ म्हणजे ‘मरता तब हटता’ (मरतो तेव्हा हटतो) अशी त्यांनी मरहठ्ठ शब्दाची लोकगुणवाचक व्यत्पत्ती सांगितली आहे. त्यांच्या मते मराठ्यांचा वीरश्री संदर्भ घेतला, तर ही व्युत्पत्ती खरी वाटते. परंतु मराठ्यांचा गनिमी कावा लक्षात घेता, ही व्युत्पत्ती वस्तुस्थितीला धरू न आहे असे वाटत नाही. वि. का. राजवाडे हे आपल्या महाराष्ट्राचा वसाहतकाल या प्रबंधात महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती रट्ट शब्दावरून झाल्याचे सुचवितात. मात्र रट्ट लोकांविषयी ते कोण, कोठले, त्यांचा वर्ण, जाती यांबद्दल कसलीच माहिती मिळत नाही. रट्ट या शब्दाचे संस्कृत रूप राष्ट्रिक म्हणजे राष्ट्रात अधिकाराचे काम करणारा मनुष्य. वर्णाने क्षत्रिय व पिढीजात पेशाने देशाधिकारी असा या राष्ट्रिकांचा किंवा रट्टांचा दर्जा असे. देसाई−देशमुखांच्याहून थोर अधिकाऱ्याला शे-दीडशे वर्षांपूर्वी सरदेसाई−सरदेशमुख असे म्हणत. तसेच हजार-बाराशे वर्षापूर्वी राष्ट्रिकाहून उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रिक किंवा महारट्ट म्हणत. मोठा किंवा महत्तर प्रांत (मोठे राष्ट्र) म्हणजे महाराष्ट्र. या महत्तर राष्ट्रावरील (प्रांतावरील) जो अधिकारी तो महाराष्ट्रिक. महाराष्ट्रिकचा अपभ्रंश महारट्ट व महारट्टचा अपभ्रंश मऱ्हाट. अशा प्रकारे राजवाडे यांनी रट्ट, महारट्ट, राष्ट्रिक व महाराष्ट्रिक यांपासून महाराष्ट्र आणि मराठे असा संदर्भ दर्शविला आहे. परंतु रट्ट लोक उत्तरेकडून दक्षिणेकडे वसाहतीस आल्याचा सबळ पुरावा मिळत नाही.
* रट्टा जनसमूहाविषयी मी मिळविलेली माहिती- राठ जनसमूहाचे लोक हे भारतातील राजस्थान आणि पाकिस्तान भागातील सिंध,पंजाब भागात वास्तव्यास आहेत. सध्या हे सर्व मुस्लिम असून यांना राजपूत असे देखील म्हटले जाते, कारण त्यांच्यात आजसुद्धा अतिप्राचीन लढाऊ कुळांची नावे आहेत. त्यांच्यात आजसुद्धा प्राचीन काळातील परंपरा जपल्या जातात. राठ लोक सध्याच्या चोलीस्तान म्हणजेच रोही जिथे सप्तसिंधूचा परिसर आहे. हरका नदीच्या किनारी यांची मोठी वस्ती आहे. यांचा परंपरागत व्यवसाय हा मेषपालन, गोपालन असून शेती देखील देखील करतात. ते वर्षातील ३ ते ९ महिने भटके जीवन जगतात.
संशोधकांच्या मते राठ हे नाव त्यांना राठी नामक गाई पाळत असल्यामुळे पडले आहे.ज्यांना सध्या झेबू असे म्हणतात. यांच्यात परिहार (प्रहार), जोहीया आणि बोहार नावाचे उपसमूह आहेत. तेथील लोककथानुसार प्रहार हे मुळचे परिहार टोळ्यांचे लोक आहेत. तर जोहीया आणि बोहार हे स्वतःचे मूळ भट्टी या टोळीत असल्याचे सांगतात. प्रहारमध्ये परिहार,कोटोवार,दहिया,शेख, लाड आणि कोरिया हि कुळे आहेत. तसेच काहीच्या मते हे मुळचे हरियाणातील पाचहाडा (पाछडा) जनसमूहातील आहेत. हे लोक निम-भटके असून मुळचे घग्गर नदीकाठच्या परिसरात राहतात.
* महाराष्ट्र-महारठ्ठ-रठ्ठ या नामचिकित्सेवरून या प्रदेशात ‘रट्ट’ लोकांनी मूळ वसाहत केली असे दिसते. येथील मूळ लोकांचे मूळ नाव मरहट्टे-मऱ्हाटे-मराठी असे असावे. ‘मरहट्ट’ हा शब्द कानडी असून ‘झाडीमंडळ’ असा प्रदेशवाचक एक अर्थ व झाडीमंडळातील ‘हट्टीजन’ (पशुपालन करणारे ) असा दुसरा लोकवाचक अर्थ होता. महाराष्ट्राचे मूळ नाव 'मरहट्ट' असून तिथे हट्टी किंवा हाट लोकांची वस्ती हट्टी होती.वऱ्हाडात हटकर- धनगर लोकांची वस्ती आहे. आणि मूळ महाराष्ट्र म्हणजे वऱ्हाडच होय. शेतीविकासासाठी येथले दर्भ (गवत) काढले म्हणून त्याला 'विदर्भ' म्हणतात. असे हि एक मत आहे. त्याचे बोलीभाषेतील नाव वऱ्हाड. त्याची व्युत्पत्ती वरहाट (उत्तम प्रतीची बाजारपेठ) यावरून झाली असावी. शं. ब जोशी यांच्या मते यांच्या मते महाराष्ट्र या देशाचे मूळ नाव मरहट्ट असे होते. ते नाव कानडी आहे. मर हा कानडी शब्द असून त्याचा अर्थ झाड असा आहे. दंडकारण्यातील या झाडी मंडळासच पुढे मरहठ असे नाव मिळाले असा भावार्थ. (मर= झाड, हट्टी= प्रदेश).
* हट्ट, हट्टी हे पट्टी या संस्कुत शब्दाचे कानडी रूप होय. महाराष्ट्राचे प्राचीन रूप झाडीमंडळाचेच असल्याने त्याला मरहट्ट नाव पडले असावे असा त्यांचा तर्क आहे.झाडीमंडळ असे वऱ्हाडचे एक दुसरे नाव पूर्वी रूढ होते. तेव्हा झाडीत राहणारे हट्टी ते मरहट्टे लोक होत आणि त्यांच्यावरून त्यांच्या भाषेला नाव हे स्पष्ट आहे.जोशी यांनी हट्टी- हटक जनांचा ईश्वर तो हाटकेश्वर असा समास सोडविला आहे.मरहट्टाच्या नावाची ओळख ज्यात स्पष्ट दिसते अशा मऱ्हाटी > मराठी या नावने ते ओळखले जाऊ लागले. डॉ. विल्सन यांनी मोल्सवर्थच्या कोशाच्या प्रस्तावनेत व इ. १८७२- ७३ च्या अहवालात म्हटले आहे, 'मरहट्ट हे नाव महाराष्ट्र या संस्कृत शब्दाचे पाली रूप आहे. हे रूप मल्लराष्ट्र या शब्दाबरोबर विष्णूपुरण वगैरे पुरण ग्रंथात येते.कर्नाटकात हटगार (हट्टीकार) म्हणजे धनगर. smile emoticon हालूमतदवरु= दुधाचा व्यवसाय करणारे धनगर- गवळी ) यांची मूळ वृत्ती गोधन सांभाळण्याची. 'हट्टी' पदाने युक्त आजही ग्रामनामे कर्नाटकातच आहेत. कानडीतील नाचिरजिय, मंगराजनिघंटु वगैरे जुन्या शब्दकोशात 'हट्टीकार' म्हणजे गवळी असा अर्थ दिलेला आहे. प्राचीन काळात टोळ्या टोळ्यातील युद्धाचे कारण गोधन हेच असे. गम= जाणे या धातूच्या मागे 'गोषु' (गोसमूहात) हा शब्द जोडल्याने 'युद्धावर निघणे' असा अर्थ निष्पन्न होतो. गोत्र हा शब्दही मुळात 'गोष्ठ' (गोठा= Cowstall) याच अर्थाचा होता. योगायोगाने प्राचीन काळापासून दक्षिणेत गाईच्या गोठल्या सुद्धा 'हट्टी' असाच शब्द आहे, तसेच गोपालक लोकांना 'हट्टीकार'.
* कर्‍हाड- या प्रांतांत चार हजार शहरें असावीं म्हणून याला करहाट चार हजार प्रांत म्हणत. करहाटक या देशावर पाच पांडवांपैकी एक सहदेव यांच्या विजयाचा उल्लेख महाभारत सभ्पार्व मध्ये आढळतो.- 'नगरी सज्यंती च पाखंडं करहाटकं दूतैरेवशे चके करं चैनानदापयत्'। दंडक— या नांवाचा कोंकणपट्टीत प्राचीन कालीं एक देश होता. सहदेवानें पश्चिम किनार्‍याचे जे देश जिंकले त्यांत शूर्पारक, दंडक आणि करहाटक या तीन देशांची नांवे आहेत. ख्रिस्ती शकापूर्वी २०० सालापासून व ख्रिस्ती शकानंतर १०० सालापावेतोच्या लेखांत कर्‍हाडचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो, आणि त्यांत असें लिहिलेलें आहे कीं, कर्‍हाडच्या यात्रेकरूंनीं मध्यप्रांताच्या जबलपूरजवळील भारहुतस्तूप येथें व कुलाब्यांतील अलिबागेच्या दक्षिणेस तीस मैल अंतरावर असलेल्या कुडा येथें देणग्या दिल्या होत्या. त्या लेखावरून असें दिसतें कीं, कर्‍हाडास, करहाटक म्हणत असत. शालिवाहन शकाच्या ११ व्या शतकांत येथें शेलारांचें राज्य होतें (वि. विस्तार पु. २२ पा. १०१). कर्नाटकातील उत्तरकालीन सिंदराजे आपल्याले खात स्वतःचा ‘करहाटपूर वराधिश्वेर’ असा निर्देश करतात, यावरून ते मूळचे करहाटचे होते, हे निश्चित. कर्नाटकातील काही सिंदराजांच्या लेखांत ते मूळचे करहाटकचे होते, असे उल्लेख येतात. यावरून सिंदनृपती आदित्यवर्मा याची राजधानी करहाटकच असावी असे वाटते. नंतर शिलाहार द्वितीय जतिग याने तो प्रदेश जिंकून करहाटक येथे आपली राजधानी केली असावी. या शाखेचा पहिला ज्ञात लेख मारसिंहाचा (१०५८) मिरज ताम्रपट होय. मारसिंह (कार. १०५०–७५) याच्या ताम्र पटात द्वितीय जतिगाचा मुलगा व उत्तराधिकारी गोंक याचे वर्णन असून तो करहाटक, कुण्डी, मिरिज देश यांचा अधिपती असल्याचा उल्लेख आहे. गोंकानंतर त्याचा मुलगा मारसिंह गादीवर आला. त्यावरून शिलाहारांची आरंभीची राजधानी करहाटक असावी.
* शिलाहारवंशी राजकन्या चंद्रलेखा हिच्या चालुक्य राजा सहाव्या विक्रमादित्याबरोबरच्या करहाटक येथील स्वयंवराचे वर्णन बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरितात आहे. तिच्या पित्याचे नाव करहाटपती असे त्यात आले आहे. राजा मारसिंह हा तिचा पिता असावा. या शाही विवाहानंतर शिलाहारांनी आपली राजधानी करहाटकहून कोल्हापुरास हलविली असे दिसते; तथापि करहाटक येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि सहाव्या विक्रमादित्याचा मांडलिक जोगम हे काही वर्षे राज्य करीत होते, असे कोरीव लेखांत उल्लेख आढळतात. कोल्हापूर व त्याच्या आसमंतात सापडलेल्या अनेक कोरीव लेखांत व वाङ्‌मयातही त्यांचा उल्लेख ‘करहाटाधिपती’ असाच आढळतो.
* महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणोन महाराष्ट्र’ असा उल्लेख महानुभावी ग्रंथकारांच्या आचारमहाभाष्यातही मिळतो.
* मराठीच्या अस्तित्वाबद्दलचा आणखी एक उल्लेख धर्मोपदेशमाला या ग्रंथात सापडतो. इ. स. ८५९मध्ये हा ग्रंथ लिहिला गेला. या ग्रंथात मराठी भाषेचं पुढीलप्रमाणे वर्णन केलं आहे -
सललिय-पय-संचारा पयडियमयणा सुवण्णरयणेल्ला।
मरहट्टय भासा कामिणी य अडवीय रेहंती॥
याचंच संस्कृत भाषांतरही आहे -
सललितपदसंचारा प्रकटितमदना सुवर्णरचनावती ।
मरहट्ट भाषा कामिनी य अट्वी च राजन्ते ॥
या श्लोकात मराठी भाषेस सुंदर कामिनीची उपना देऊन ती अटवीप्रमाणे सुंदर गतीची, मदनाने उद्दाम, चांगल्या वर्णाची आहे, असं वर्णन केलं आहे.
* मराठीच्या अस्तित्वाचा आणखी एक फार जुना व महत्त्वाचा पुरावा कुवलयमाला नावाच्या ग्रंथात मिळतो. हा ग्रंथ उद्योतनसूरी याने इ. स. ७७८मध्ये लिहिला. या ग्रंथात गोल्ल, मध्य, मागध, अंतर्वेध, कीर, टक्क, सैंधव, मारव, गुर्जर, लाड, कण्णाड, तायिक, कोसस, मतहट्ठ, आंध्र, खस, पारस, बर्बर इत्यादी अठरा देशी भाषांचा उल्लेख आहे. पुढे प्रत्येक देशातील मनुष्याचं वर्णन करून त्याच्या भाषेतील अतिशय ठळक अशी लकब सांगितली आहे. उदा. तेरे मेरे आउति जंपिरे मज्झदेसे म्हणजे तेरे मेरे आओ असं म्हणणार्‍या मध्यदेशीयास पाहिले. असंच पुढे गुर्जर, माळवी या लोकांचं व त्यांच्या भाषांचं वर्णन आहे.
"दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसिले य |
दिण्णले गहिल्ले उस्लविरे तत्थ मरहट्टे || "
अर्थ- [घटमुट, काळासावळा, सहनशील, अभिमानी कलहशील- भांडखोर व 'दिण्णले गहिल्ले' असे बोलणारा तो मरहट्टा होय.] (मरहट्ट- महरट्ट- महाराष्ट्र)
* विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र होय. श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केले आहे. भाषिक उत्क्रांतीच्या अनुषंगाने मराठ्यांच्या इतिहासाचे स्पष्टीकरण करताना राजारामशास्त्री पुढे सांगतात, “”जर मरहट्टी (महाराष्ट्री) भाषा सूरसेनी भाषेची एक प्रकृती, जर सूरसेनी भाषा जशी मगधी भाषेची तशी पिसाची (पैशाची) भाषेची प्रकृती, तर मरहट्ट लोक पूर्वी कधी तरी हिमालयापर्यंत पसरलेले असून, हळूहळू त्यांच्यापासून सूरसेन निराळे पडले व पुढे सूरसेनास उतरती कळा लागली. तेव्हा पश्‍चिमेकडचे पिसाच स्वतंत्र होऊन पूर्वेकडेस मगध्यांनीही स्वतंत्रपणा मिळवला, अशी अगदी जुनाट हकिगत समजणे भाग पडले.”
* इ.स.वी. सन १२ व्या शतकानंतर देवगिरीचे आणि हाळेबीडूचे यादव यांच्यात जरी गृहकलहामुळे हा देश दोन भागात वाटला गेला ते म्हणजे मरहट्टा आणि कर्नाटका. (संत रामदास यांनी या दोन भागाला त्यांनी लिहिलेल्या एका आरतीत एकाच स्थान म्हटले आहे-(जयदेवी जयदेवी जयवेद माते | हाटक कर्नाटक करुणा कल्लोळी | )
* I'मरहट्टा' हा प्राकृत शब्द जैन महाराष्ट्री साहित्यात आढळतो. मराठा देशातील मेषपालक लोकांना मराठे असे म्हणतात. (मरहट्टा (एकवचन) / मरहट्टे (बहुवचन) / बर-हट्टा म्हणजेच हटकर). (पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागातील 'हटकर' लोकांना 'मराठा धनगर' असे देखील म्हटले जाते.) द्राविडीयन शब्दकोशानुसार हट्टी हा शब्द 'प'ट्टी या शब्दाचे एक रूप आहे. कर्नाटकात मेश्पालक आणि गोपालक यांना पूर्वी 'हट्टीकारा' असे म्हटले जात असे.मध्य-युगात पट्टीजन हा भाग नर्मदेच्या दक्षिणेला होते. आजसुद्धा पूर्वीचा बेरार भाग म्हणजेच हिंगोली,परभणी,वाशीम यांच्या आजूबाजूचा परिसरात हटकरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच हटकर देवगिरीच्या यादवांपासून लष्करात असल्याचे उल्लेख आढळतात. महाराष्ट्र देशाला संस्कृतमध्ये मूळ भाषा 'मरहट्टा' म्हणून उल्लेख आहे. मरहट्टा आणि मरहाटा या दोन्ही शब्दात 'हट्टा' हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वाभाविकरित्या हा भाग हट्टादेश म्हणून ओळखला गेला असावा. नाशिक जवळ असलेले त्र्यंबकेश्वाराला 'हाटकेश्वर' म्हटले जायचे. वाचस्पत्यकोश ग्रंथात असे लिहिले आहे कि, "दृष्टं त्रैलोक्यभर्तारं त्र्यंबकं हाटकेश्वरम |".

https://www.facebook.com/anil.waghmare.7503/posts/1169876289750774


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).