"तुर्क राजकन्येशी विवाह करणारा ललितादित्य महान!
काश्मीरचा इतिहास हा भारताचा इतिहास आहे. भारताने कधी उपखंडाबाहेर आक्रमणे केली नाहीत, विजय मिळवले नाहीत या समजाला खरे तर चंद्रगुप्त मौर्यापासून ते ललितादित्य मुक्तापीडापर्यंत अनेक सम्राटांनी छेद दिलेला आहे, पण त्याबद्दल फारसे बोलले जात नाही. चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांचा उपनिवेश असलेल्या अफगाणिस्तान ते बल्खवर आक्रमण करुन विजय तर मिळवलेच पण तेथील ग्रीक फआशासक सेल्युकस निकेटरच्या हेलन या कन्येशीही विवाह केला आणि एका अर्थाने विवाह संबंधाने ग्रीकांशी नाते जोडले. विजयांची परंपरा कायम ठेवत विवाहसंबंधाने तुर्कांशी राजनैतिक संबंध दृढ करणारा आणि काश्मीरमध्ये आठव्या शतकात उदयाला आलेला भारतातील शेवटचा सम्राट म्हणजे ललितादित्य!
ललितादित्याबद्दल कदाचित आपण प्रथमच ऐकत असाल. तसेही आपण इतिहास जतन करण्यात फारच मागास. पण हा ललितादित्य एवढा पराक्रमी सम्राट होता की त्याने अफगाणिस्तान, तुर्कस्तान आणि चीनचा झिंझियांग परगणा जिंकत तत्कालीन महासत्ता तिबेटलाही पश्चिमेकडे विस्तार करण्यापासून रोखले. अर्धा भारतही त्याच्या अंमलाखाली आला. सिंध प्रांतात मोहम्मद कासिमचे आक्रमण झाले होते. तो जेंव्हा काश्मीरवरही चालून आला तेव्हा ते परतवण्यात ललितादित्याचा थोरला भाऊ यशस्वी झाला. ललितादित्याने सत्तेवर येताच सर्वप्रथम अरबांशी युद्ध छेडले. अरब गव्हर्नर तामिमला नुसते हुसकावून लावून तो थांबला नाही तर त्याचा पाठलाग करत झाबूल (आत्ताच्या अफगाणिस्तानचा भाग) येथे त्याला ठार मारले. तोखारीस्तान (आताचा तुर्कस्तान) येथे तेंव्हा अरब सत्ता गाजवत हो्ते. ललितादित्याने तोखारीस्तानवर आक्रमण करत तेथुनही अरबांना हुसकावून लावले. व्यापारी मार्ग मूक्त केले. विजनवासात गेलेल्या तोर्दू या तुर्क राजाला आपला मांडलिक करत पुन्हा गादीवर बसवले.
या उपकाराची फेड करण्यासाठी व राजकीय संबंध घनिष्ठ करण्यासाठी तोर्दूने आपली कन्या इशानदेवी ही ललितादित्याला विवाहात दिली. त्यावेळीस तुर्कस्तान हा बौद्ध धर्मीय होता. ललितादित्य हिंदू. पण तत्कालीन सामाजिक वातावरण फार सहिष्णू होते. इशानदेवीने काश्मीरमध्ये आल्यावर विहार तर बांधलेच पण मंदिरेही बांधली. परिहासपुर या ललितादित्याने वसवलेल्या राजधानीत लोकांच्या सोयीसाठी मोठे जलकुंडही निर्माण केले. तिच्यासोबतच आलेला तिच्या भावाचे नाव इशानचंद्र. ललितादित्याने तुर्कस्तानातून चंकूण नावाचा एक सेनानीही आणला. तो त्याच्या दरबारात पुढे अत्यंत प्रतिष्ठेला पोहोचला.
चंद्रगुप्त मौर्यानंतर विदेशी संस्कृतीतील लोकांशी सौहार्दमय संबंध जोडण्यासाठी विदेशी पत्नी करणारा ललितादित्य महान हा एकमेव सम्राट. पण दुर्दैवाने तो लोकांना माहितच नाही. अशा सम्राटाचा साद्यंत इतिहास मी "काश्मीरचा सम्राट ललितादित्य" या लवकरच प्रकाशित होणा-या पुस्तकात मांडला आहे. जिज्ञासुंनी तो अवश्य वाचावा आणि तत्कालीन वादळी काळही समजावून घ्यावा. आजचेही आंतरराष्ट्रीय संबंध सुरळीत करण्यासाठी या इतिहासाचा उपयोग होईल याची खात्री आहे. काश्मीर नेहमीच भारताचा अविभाज्य इतिहास राहिलेला आहे याचीही जाणीव यामुळे होईल."
-संजय सोनवणी
-संजय सोनवणी
Comments
Post a Comment