लोकदेवता श्री. क्षेत्र धुळोबा मंदिर, धुळदेव (ता. हातकणंगले- जि. कोल्हापूर)
* लोकदेवता श्री. क्षेत्र धुळोबा मंदिर, धुळदेव (ता. हातकणंगले- जि. कोल्हापूर)- या वर्षी कर्नाटक येथे माय्याक्का देवीच्या यात्रेच्या निम्मिताने मला धुळोबा या देवतेबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातील पशुपालक समाजात अनेक लोकदेवता असून ते सर्व हट्टी धनगरांचे पूर्वज असल्याचे मानले जाते. हातकणंगले तालु्क्यात आळते येथे डोंगराच्या कुशीत धुळोबा, भिवाया देवस्थान वसलेलं आहे. नागमोडी रस्त्यावरून जाताना दुतर्फा असणाऱ्या वनराईमुळे वेगळाच आनंद मिळतो. मंदिराच्या परिसरात, गावात अनेक वीरगळी असून त्यांची अवस्था फारच दयनीय आहे. त्या रस्त्याच्या कडेला वाईट अवस्थेत पडलेल्या आढळून येतात.
* श्री. धुळोबापासून काहीच अंतरावर नीरा नदीच्या किनारी त्यांच्या सात बहिणीचे मंदिर आहे ज्यांना अनेकवचनी मध्ये भिवाया म्हटले जाते. ओव्यांमध्ये धुळोबाच्या जन्म, बालपण, तारुण्य, विवाह, गृहस्थी जीवन आणि दुष्टांचा-राक्षसाचा नाश अश्या कथा असतात. धुळोबाच्या वडिलांचे नाव कमळू शिंदे असून आईचे नाव लक्ष्मिबाइ होते, ते धुळोबाला माहाकाळ (शंकराचा) अवतार मानीत. पाश्चात्य संशोधक 'अने फेलधौस' हिने ओव्यांच्या माध्यमातून लिहिलेल्या पुस्तकात पुढील भाग येतो. कमळू शिंदे हा मेंढपाळ करणर व्यक्ती होता. त्यांनी मिठाबाई नावाच्या एका मुलीला पाहिले आणि स्वतःचा मुलगा धुळोबा याच्याबरोबर विवाहासाठी मिठाबाईच्या वडिलांना मागणी करण्यासाठी वाघमोडे(Med) राजांच्या वाड्यावर गेले. मिठाबाई हि एका श्रीमंत (धनिक) वाघमोडे राजाची मुलगी होती. वाघमोडे राजाने त्यांनी अशी अट घातली कि मुलीच्या वजनाएवढ धन (सोने) तुम्हाला द्यावे लागेल. पण शिंदेला धन म्हणजे काय हेच माहित नव्हते, त्याच्यासाठी त्याच्या मेंढ्याच त्याचे धन होत्या. म्हणून तो ९ लाख मेंढ्या घेऊन आला. आणि त्या प्रत्येक मेंढी बरोबर एक सोन्याने भरलेली पिशवी होती. जेव्हा वाघमोडे यांनी 'तुला' करण्याचा समारंभ सुरु केला, त्यावेळेला 'तुला' काही पूर्ण होईना. शिंदे हे अजून सोन्याच्या पिशव्या घेऊन येत होते, तरीपण मिठाबाई इतक वजन त्या सोन्याचे होते नव्हते. त्या वेळेला धुळोबाने आपल्या वडिलांना सांगितले कि बहिण भिवाईची एक कानकुडी तिथे ठेवा. ती ठेवल्यानंतर 'तुला' पूर्ण झाली. आणि विवाह हि संपन्न झाला. आणि अश्या प्रकारे भिवाई बहिणीने धुळोबाला लग्न करण्यासाठी एक प्रकारे कानकुडी म्हणून भेटच दिली. अशी कथा सांगितली जाते.
* धनगर सरदार घराण्याचे अभ्यासक श्री.संतोषराव पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार- दंतकथा आख्यायिका व सामाजिक परंपरा भाविक लोकांच्या श्रद्धांनुसार भगवान शंकराने श्री महांकाळेश्वर म्हणजे ग्रामीण रूढ भाषेत धुळेश्वर उर्फ धुळोबा अवतारात माळशिरस येथील वाघमोडे नावाच्या राजाच्या मुलीशी विवाह केला होता. अशा आख्यायिका सांगितल्या जातात. काही धनगरी ओव्यांमध्ये ही या विवाहाची कवने गायलेली दिसतात. या कथांमधील अस्सल ऐतिहासिक साधनांशी जुळणारी गोष्ट एवढीच ती म्हणजे मौजे माळशिरस (सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे ठिकाण) मराठेशाही अखेरपर्यंत वाघमोडे घराण्याकडे पाटील वतनात राहिले. ब्रिटिश काळातही ही पाटीलकी वाघमोडे यांच्याकडेच असावी. यावरून या घराण्याचे प्राचीनत्व लक्षात येते. बहामणी सुलतानशाहीच्या काळातही या घराण्याची पाळेमुळे महाराष्टृातील अनेक गावांशी जोडली गेलेली दिसतात. माळशिरस तालुक्यातील मौजे माळशिरस, मौजे फोंडशिरस ,भांबूर्डी, उदरे इंदापूर तालुक्यातील बोरी, लासुर्णे अशी अनेक गावे वाघमोडे यांच्याकडे सुलतानशाही अथवा त्याही पूर्वीपासून पाटील वतनात चालत आलेली आहेत.
* धुळोबापासून जवळच रामलिंग येथे अत्यंत प्राचीन गुहा मंदिर आहे. बाहेर कितीही उन्हाळा असो येथील गुहेत सतत पाणी पाझरत असतं आणि त्या पाण्याचा गुहेतील शिवलिंगावर अभिषेक होत असतो. रामलिंग मंदिराच्या परिसरात कश्यप, अत्र, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ या सप्तऋषींच्या नावाने मंदिरे आहेत. तर मंदिरालगत भव्य पाण्याची टाकी व झरे आहेत. मंदिराबाहेर अत्यंत प्राचीन मूर्तीही आढळतात. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्य केले तसेच शिवलिंगाची स्थापना केली अशी आख्यायिका आहे पूजेसाठी त्यांनी बाण मारून गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी धारा सुरू केल्याची अख्यायिकाही सांगितली जाते. रामलिंगपासून २ किलोमीटर अंतरावर डोंगर माथ्यावर अलमप्रभूगिरी हे देवस्थान आहे. तसेच जैन धर्मीयांचे कुंथूगिरी हे देवस्थान देखील जवळच आहे.
* धुळोबाची यात्रा चैत्राच्या महिन्यात म्हणजेच मार्च- एप्रिल मध्ये असते. यात भंडारा, खोबऱ्याची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात व देवाची भाकणूक सांगितली जाते. धनगरांचे पारंपारिक गजी नृत्य सादर केले जाते. यात्रेदरम्यान तो एक सुवर्ण क्षणच असतो. या यात्रेत कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील धनगर- मेंढपाळ देखील सामील होतात. आजही धनगरामधील वाघमोडे घराण्याचे कुळदैवत हे धुळोबा आहे. त्याचे टाक अथवा मंदिर बांधून त्यांची पूजा करण्यात येते, त्यांनाच पूर्वजदेवता म्हटले जाते. नंतर याच लोकदेवता झाल्या. या गोष्टी फक्त धुळोबा देवता किंवा महाराष्ट्रातील धनगरबद्दलच मर्यादित नसून, संबंध भारतात सध्या जिथे कुठे पशुपालक लोक राहतात, त्यांच्या संस्कृतीत लोकदेवतांबद्दल अशी अनेक रहस्य दडली आहेत.
Comments
Post a Comment