गोब्राह्मणप्रतिपालक म्हणजे काय?
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवरायांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हटल्यावरून बरीच आदळआपट सध्या चालू आहे. शिवराय हे जर साऱ्या जनतेचे होते तर त्यांना गो व ब्राह्मण यांचे प्रतिपालक ठरविणे गैर आहे अशी तक्रार आहे. गोब्राह्मणप्रतिपालक ह्या शब्दाचा अर्थ नीट ध्यानी न आल्यामुळे हा गोंधळ होत आहे हे सांगण्यासाठी हा लेख.
शंकराचार्यांच्या गीताभाष्यात सुरुवातीला त्यांनी अशी भूमिका घेतली आहे की (जणू) भगवंतांनीच निर्णय केला की वर्णधर्माचे पालन व्यवस्थित होण्याकरिता श्रीकृष्णांचे माध्यम वापरून अर्जुनाच्या निमित्ताने उपदेश करावा जेणेकरून ब्राह्मण्यत्वाचे रक्षण होईल.(ब्राह्मण्यत्व वा ब्राह्मण्य म्हणजे इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती हा जो समज पसरविलेला गेलेला आहे तो संपूर्ण चूक आहे. ब्राह्मण्य ही अवघड गोष्ट असून आता तसे ब्राह्मण पाहायला मिळणे कठीणच आहे.)
जेव्हा मी हे पूर्वी कधीतरी कोणाच्या तरी लेखात वाचले होते तेव्हा फार धक्का बसला होता. पुढे अभ्यासासाठी गीताभाष्य हाती धरले तेव्हा कळले की आपण अर्धवट वाचले होते वा आपल्याला अर्धवटच वाचायला मिळाले होते. ब्राह्मण्याचे रक्षण केले तरच 'ब्राह्मणादि वर्णांची' व्यवस्था राहणार असल्याने ब्राह्मण्यरक्षणाचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे.
शंकराचार्य साधारण दीड हजार वर्षापूर्वीचे आहेत आणि शिवराय तुलनेने अलीकडचे आहेत. परंतु, समाजव्यवस्थेतील बदल हा इंग्रज आल्यानंतरचा आहे, त्या दृष्टीने आचार्यांचे सांगणे आणि शिवरायांचे करणे हे पाहिले पाहिजे. मला तरी आचार्यांचे सांगणे शिवरायांच्या कृतीमुळेच कळले.
शिवराय सर्व जनतेचे होते वा नाही हा वादाचा मुद्दाच नाही. ते केवळ ब्राह्मणप्रतिपालक नव्हते, तसे म्हणू नये - प्रसंगी ब्राह्मणांचाही मुलाहिजा राखू नये अशा त्यांच्या आज्ञा आहेत हा मुद्दा आहे. सर्वधर्मसमभाव प्रत्यक्ष कृतीतून दाखविणाऱ्या शिवरायांचा जन्म आपल्या जातीसाठी झाला होता हे दाखविण्यासाठी ब्राह्मण इतिहासकार हे असे शब्द वापरतात असा त्यांच्यावर आक्षेप आहे.
वास्तविक ज्यांच्या नावामागे गोब्राह्मणप्रतिपालक ही पदवी लावली गेली असे शिवराय पहिले नव्हेत. ही पदवी फार जुनी आहे. तिचा अर्थ ब्राह्मणादि वर्णांचे रक्षण करणारा - गौ आदि पशुधन सांभाळणारा असा आहे. गाय या शब्दाचा अर्थ येथे पशु - पशुधन होतो आणि ब्राह्मण ह्या शब्दाचा अर्थ ब्राह्मणादि - म्हणजेच सर्व समाज असा होतो. तो नीट लक्षात घेतला की ही पदवी थोर राज्यकर्त्यांस का लावीत असतील ते लगेच कळेल. कृषीप्रघान व्यवस्थेत पशुधनाचे महत्त्व किती हे काय कुणी सांगायला हवे?
शिवरायांचा विशेष असा की त्यांनी योग्य व्यक्ती योग्य जागी नेमल्या व अयोग्य व्यक्तींचा मुलाहिजा ठेवला नाही. अष्टप्रधान मंडळ नेमून राज्य करणाऱ्या ह्या राजास आठापैकी सात मंत्री ब्राह्मण नेमताना इतरांवर आपण अन्याय करीत आहोत असे वाटण्याचे कारणच नव्हते कारण क्षत्रियांचे हे कामच की त्याने ज्याला त्याला योग्य काम देऊन समाजाची घडी नीट राहील हे पाहावे. तशी घडी महाराजांनी बसविली. ह्या ब्राह्मणांनी राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था राखायची होती व त्यासाठीच त्यांना भरपूर पगाराच्या नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. ही मंडळी पगारी होती व त्यांनी केवळ ब्राह्मणच नव्हे तर सर्व वर्णांचे हित होईल असे वागायचे होते. ती निवड योग्य होती किंवा कसे हे आपण बोलण्याची गोष्ट नव्हे. तो महाराजांचा निर्णय होता हे समजले की पुरे.
या साऱ्यावरून माझे अनुमान सांगतो की - गोब्राह्मणप्रतिपालक आणि गोशूद्रप्रतिपालक हे समानार्थी शब्द होत.
चारही वर्णांचे म्हणजेच पूर्ण समाजाचे रक्षण करणे ह्यालाच राजधर्म असे म्हणतात आणि त्या अर्थाने शिवराय हे आदर्श धार्मिक राजे होते. असा राजा नजिकच्या भूतकाळात झाला नाही आणि राजा म्हणून नाही पण नेता म्हणूनही आपल्याला पुन्हा सहजी मिळायचाही नाही. धर्म ही गोष्ट सहजी आकलन होणारी नाही आणि म्हणून शिवराय जसे वागले तसे वागावे म्हणजे धर्मपालन होईल हा गीतेचा अभिप्राय आहे. (येथे हिंदु, वैदिक, बौद्ध, मुस्लीम, ख्रिश्चन अशा धर्मांचा विचार करीत नसतात.)
बरे, हे वरचे सारे म्हणणे केवळ माझे वैयक्तिक आकलन असते तर जो वाद चालू आहे त्याला काही अर्थ होता. परंतु, आता खुद्द शिवपुत्र संभाजीराजे आपल्या बुधभूषण ग्रंथात काय म्हणतात ते पाहा म्हणजे खात्री पटेल!
येन क्षितितले कलावविकलं बुद्धावतारं गते
गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लैच्छै: समादिते ।
भूयस्तत्परिपालनाय सकलज्वित्वा सुरद्वेषिण:
स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णा: कमात ॥
गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लैच्छै: समादिते ।
भूयस्तत्परिपालनाय सकलज्वित्वा सुरद्वेषिण:
स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णा: कमात ॥
अर्थ : पृथ्वीवर हाहा:कार माजला असता बुद्धावतार झाला. त्याचप्रमाणे म्लेंच्छांनी सर्व वर्णांची पायमल्ली केली असता, छत्रपती शिवाजी महाराजांनी गायी आणि ब्राह्मणादी वर्णांचे देवद्वष्ट्यांकडून रक्षण करून धर्ममार्ग दाखवला !
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1583283168602780&id=100007633369095
Comments
Post a Comment