मिथ्रधर्म
मिथ्रधर्म : (मिथ्र) वा मिथ्रस (वैदिक मित्र) या देवतेची उपासना सांगणारा एक प्राचीन धर्म. प्राचीन इराणमध्ये निर्माण झालेला आणि तेथून रोमन साम्राज्यपर्यंत पसरलेला हा धर्म इ. स. पूर्वीच्या व नंतरच्या काही शतकांत अधिक प्रभावी होता. ‘गूढ धर्म' म्हटला गेलेल्या धर्मांत त्याचा अंतर्भाव होतो. मिथ्रासंबंधीच्या पुराणकथेनुसार त्याचा जन्म गुहेतून (Guhil or Gehlot) वा खडकातून झाल्याचे वर्णन आढळते. त्यामुळेच त्याच्या पूजेसाठी मंदिर म्हणून गुहेचा वापर केला जात असे. मेंढपाळ हे त्याचे पहिले उपासक मानले जात. वैदिक वाङ्मयात ‘मित्र' शब्दाचा अर्थ मित्र (दोस्त) असा असून तेथे सूर्यदेवता असलेल्या मित्राचे स्थान गौण होते. अवेस्तामध्ये ‘मिथ्र' म्हणजे करार असा अर्थ असून वेदांच्या तुलनेत तेथे या देवतेला अधिक महत्त्व असलेले दिसते. अवेस्ताच्या गाथांमध्ये मिथ्राचा उल्लेख नाही. जरथुश्त्रानेही त्याची उपेक्षाच केली होती. अवेस्ताच्या ‘यश्त' नामक भागामध्ये मात्र त्याच्याविषयी प्रदीर्घ सूक्ते असून त्याला सत्याचा व वचनांचा पालनकर्ता मानलेले आहे. तसेच तो युद्धदेव आणि ⇨अहुर मज्दाचा साहाय्यकही आहे.
हट्टी लोकांच्या दोन हिटाइट राजांमध्ये झालेल्या करारासंबधीचे जे कोरीव लेख सापडले आहेत, त्यांतील उल्लेखांवरून हे स्पष्ट झाले आहे, की इ. स. पू. चौदाव्या शतकात मिटॅनीमध्ये मित्रदेवतेची पूजा होत होती. हा धर्म इराणमधून रोमन साम्राज्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत त्याच्यावर बॅबिलोनियाचा व खाल्डियाचा प्रभाव पडलेला दिसतो.
प्रत्यक्ष रोम हे या धर्माचे एक प्रमुख केंद्र होते. काही अभ्यासकांच्या मते हा धर्म अधिकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होता, तर काहींच्या मते तो सर्वसामान्य लोकांमध्ये अधिक प्रिय होता. काही राजेलोकांनीही त्याचा स्वीकार केला होता. काही काळ अत्यंत प्रभावी असूनही ख्रिस्ती धर्मापुढे त्याचा टिकाव लागला नाही. इ. स. चौथ्या शतकात तो इतर ⇨पेगन धर्मांबरोबर दडपून टाकण्यात आला. मंदिर म्हणून वापरल्या जाणाऱ्या या धर्माच्या गुहा बंद करण्यात आल्या आणि त्याचे असंख्य अनुयायी ख्रिस्ती बनले, तर काही थोडे लोक मणिपंथी बनले. काही बादशहांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर मिथ्रधर्माच्या अनुयायांचा छळही झाला. इ. स. ३९४ मध्ये थिओडोसिअसचा विजय झाल्यावर या धर्माचे प्रभावीपणे उच्चाटन करण्यात आले.
दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात हा धर्म ख्रिस्ती धर्माचा प्रमुख स्पर्धक होता. अर्नेस्ट रेनन यांनी असे म्हटले आहे, की जर काही कारणाने ख्रिस्ती धर्माचा विकास कुंठित झाला असता, तर ख्रिस्ती धर्माची जागा मिथ्रधर्माने घेतली असती. या दोन्ही धर्मात अनेक बाबतींत साम्य होते. प्रथम आठवड्याचा पहिला वार हा ‘मित्रा' चा रविवार होता. नंतर त्याचे खिस्तीकरण झाले. ‘अखेरचा निवाडा' वगैरे सिद्धांतांच्या बाबतीतही या दोन धर्मांमध्ये साम्य होते. परंतु मिथ्रधर्माने फक्त पुरूषांना प्रवेश दिला आणि त्याचा प्रसार प्रामुख्याने सैनिकांमध्ये असल्यामुळे या धर्माला कौटुंबिक आधार मिळू शकला नाही. शिवाय, या धर्माचा उपास्य मिथ्र हा पुराणकथात्मक होता, तर ख्रिस्ती धर्माला येशू ख्रिस्तासारख्या ऐतिहासिक पुरूषाचे अधिष्ठान होते. अशा अनेक कारणांनी मिथ्रधर्म हा ख्रिस्ती धर्मापुढे निष्प्रभ झाला
Comments
Post a Comment