सेन/सेनगर/सनगर(कोष्टी-साळी/साळीवाहन/साळवी) वंशाचा इतिहास.



साळी (अथवा शाली/शालीय) हा शब्द शाल (साल) वृक्षाच्या सालीपासुन पुरातन काळी वस्त्रे बनवत त्यांना मिळाला.पुरातन काळापासून मानवी समाजाने प्रतिकुल निसर्गाशी झुंज देण्यासाठी कल्पकता व प्रतिभा वापरत एकामागुन एक जी साधने शोधली त्याला तोड नाही. आजच्या वैज्ञानिक प्रगतीने आपण जेवढे थक्क होतो त्याहीपेक्षा अधिक, पराकोटीच्या प्रतिकुलतेत, अत्यंत वन्य अवस्थेत पुरातन मानवाने जे शोध लावले त्यामुळे चकित व्हायला होते. किंबहुना आजचे विज्ञान आपल्या पुरातन पुर्वजांच्याच अथक प्रयत्नांच्या पायावर उभे राहत आकाशाला गवसणी घालायला सज्ज आहे.त्या आदिम काळी, जेंव्हा मनुष्य शिकारी मानव होता, तेंव्हा शिकार केलेल्या प्राण्यांचे चर्म वा झाडांच्या साली (वल्कले) गुंडाळुन प्रतिकुल हवामानाला तोंड देत होता. हळु हळु तो काही प्राण्यांना माणसाळुन पाळुही लागला. शिकारी मानव पशुपालक मानव बनला हा मानवी जीवनशैलीच्या बदलाचा एक महत्वाचा टप्पा आहे. मनुष्य अद्याप भटकाच होता. चरावु कुरणांच्या शोधात त्याला सतत भटकावेच लागे.
सरासरी २० हजार वर्षांपुर्वीच मानवाला सर्वप्रथम लोकर व वनस्पतीजन्य धाग्यांपासुन वस्त्रे बनवण्याची कल्पना सुचली असावी. पक्षांची घरटी, कोळ्यांची जाळी यांच्या सुक्ष्म निरिक्षणातुन आपणही कृत्रीमपणे नैसर्गिक धाग्यांपासुन वस्त्र बनवू शकतो ती ही अभिनव संकल्पना. कल्पना सुचुन ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला जे सायास पडले असतील...त्यासाठी जी कृत्रीम साधने बनवायला जी प्रतिभा वापरावी लागली असेल तिची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. हजारो प्रयत्न वाया गेल्यानंतरच त्याला वस्त्रनिर्मिती जमली असनार. त्यासाठीचा त्याचा पराकोटीचा संयम आदर वाटावा असाच आहे.
आस्ट्रेलिया, रशिया आणि आस्ट्रिया येथे नवपाषाणयुगातील (इसपु १०,०००) कातलेले धागे व विणलेल्या वस्त्रांचे अवशेष मिळाले आहेत. भारतात सिंधु संस्कृतीत हडप्पा व लोथल येथेही रंगवलेल्या सुती वस्त्रांचे अवशेष मिळालेले आहेत. एवढेच नव्हे तर सुत कातण्याच्या चरख्याचे व चात्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. तेथेच सापडलेल्या मानवी प्रतिमांनी बेलबुट्टीदार तलम वस्त्रे नेसलेली आपल्याला पहायला मिळतात. म्हणजेच भारतात कापसापासुन वस्त्रे बनवण्याची कला सनपुर्व दहा-बारा हजार वर्षांपुर्वीपासुनच विकसीत होवू लागली होती असे म्हणता येते. ऋग्वेदातही लोकरीच्या वस्त्रांचे विपुलतेने उल्लेख येतात. वैदिक काळातही कपडे विणण्याचे काम स्त्रीयाच करत असत. अशा स्त्रियांना वायित्री, वासोवाय अथवा सिरी म्हणत. किंबहुना जगभर आद्य विणकर या स्त्रीयाच होत्या असे आपल्याला दिसते.
धागे (मग ते लोकरीचे का असेनात.) पिंजणे, कातने ते धाग्यांची शिस्तबद्ध उभी रचना करत मग आडवे धागे अत्यंत कौशल्याने गुंफत नेत वस्त्र बनवणे ही किती किचकट व कष्टदायक प्रक्रिया असेल हे आपण सोबतच्या इजिप्तधील इसपु ३००० मधील सोबतच्या चित्रावरुन पाहु शकतो.
* संशोधक श्याम येडेकर यांच्या मते धनगर हा शब्द 'गांधार' या शब्दाशी संबंधित असावा. 'गंधर = धंगर' अश्या प्रकारे शब्दांमध्ये बदल झाला असावा. कारण ऋग्वेदात गांधार प्रदेशातील मेंढीच्या लोकरीचे स्तुत्य वर्णन केले गेले आहे. तसेच,प्राचीन काळात या भागात मेषपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचे पुरावे मिळतात.
सुरुवातीला जगभर अशाच प्रकारे वस्त्रे विणली जात असत. पुढे मात्र भारताने हातमागांचा शोध लावत इसपु १५०० ते इसवी सनाच्या बाराव्या शतकापर्यंत जागतीक वस्त्रोद्योगावर स्वामित्व गाजवले. किंबहुना भारतीय अर्थव्यवस्था ही वस्त्रांना केंद्रस्थानी ठेवतच भरभराटीला आली. हातमागाचा भारताने लावलेला शोध म्हणजे औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेशा होता. जगाला भारताने दिलेली आद्य देनगी म्हनजे वस्त्रोद्योग होय. अत्यंत मुलायम, सोपी ते क्लिष्ट संरचना, पोत आणि विण असनारी साधी ते तलम नक्षीदार वस्त्रे निर्माण करण्यात अठराव्या शतकापर्यंत भारताशी स्पर्धा करु शकणारा एकही देश नव्हता. विणकर समाजाने अवघ्या जगात भारताची निर्विवादपने शान वाढवली.
वस्त्रांचा शोध हा मानवी इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. नैसर्गिक साधनांना आपण आपले जीवन सुखकर करण्यासाठी वापरु शकतो ही जाणीव आपल्या पुर्वजांना नक्कीच प्रेरीत करुन गेली असणार.
विणकर समाजाचा उदय
प्रत्येक व्यवसायाची जात बनणे हे भारतीय समाजाचे अव्यवच्छेदक लक्षण आहे. भारतातील विणकामाचा इतिहास पुरातन असला तरी तो स्त्रियांकरवी जवळपास घरोघरी चालवला जात होता. सिंधु काळातच भारताचा विदेश व्यापार सुरु झाला. इजिप्तमधील ममींना गुंडाळलेल्या जात असलेल्या वस्त्रांत भारतीय कापसाचीही वस्त्रे मिळाली आहेत. याचाच अर्थ असा कि सनपुर्व ३२०० पासुनच भारतीय सुती वस्त्रे जगभर पसरु लागली होती. मागणी वाढली तसे विविध मानवी समुदायांतील कुशल लोक या व्यवसायात उतरु लागले. हातमागांचा शोध लावला. सुत कातणे हे काम स्त्रीयांकडे राहिले तर वस्त्रे विणने आता पुरुष करु लागले. अशा रितीने देशभर हा व्यवसाय फोफावला.
विणकरांना प्रांतनिहाय व विणण्यातील वेगवेगळी कौशल्ये यानुसार वेगवेगळी नांवे मिळाल्याचे आपल्याला दिसते. जैन कोष्टी व मुस्लिम वीणकर (मोमिन, व अन्सारी) वगळले तर या सर्वच समाजातील समान धागा म्हणजे ते शैव आहेत. चौंडेश्वरी (चामुंडेश्वरी) जिव्हेश्वर, गणपती अशा शैव दैवता त्यांची आराध्ये आहेत. लिंगायत समाजातही कोष्टी आहेत.
महाराष्ट्रात प्रामुख्याने देवांग कोष्टी, हळबी, लाड, क्रोष्टी, गधेवाल, देशकर, साळेवार, स्वकुळ साळी, सुतसाळी व पद्मसाळी अशा जवळपास पंधरा पोटजाती आहेत. वरकरणी या विविध जाती पडलेल्या दिसत असल्या तरी त्या एकाच मुळच्या समाजातुन व्यवसाय कौशल्यातील भिन्नतेमुळे निर्माण झाल्या आहेत एवढेच.
उदाहरणार्थ "कोष्टी" हे जातीनाम कोसा अथवा कोष (रेशीम अथवा कापसाचा) यापासुन वस्त्रे बनवणा-यांना लाभले. साळी (अथवा शाली/शालीय) हा शब्द शाल (साल) वृक्षाच्या सालीपासुन पुरातन काळी वस्त्रे बनवत त्यांना मिळाला. त्यात पुन्हा वस्त्रांचे अनेक प्रकार असल्याने ज्या-ज्या प्रकारची वस्त्रे बनवण्यात निपुणता होती त्यानुसार त्या त्या वर्गाला विशेषनामेही मिळाली. उदा. देव व उच्चभ्रु लोकांसाठी वस्त्रे बनवत त्यांना देवांग (अथवा देवांगन) कोष्टी म्हटले जावू लागले. काही नांवे, उदा. हळबी कोष्टी, ज्या विशिष्ट मानवी समुदायातुन आले त्यावरुन पडली. हळबी स्वत:ला मुळचे झारखंडमधील हळबा आदिवासी मानतात. यांची वसती प्रामुख्याने विदर्भात आहे.
कोष्टी/साळी/कोरी समाज देशभर पसरला असुन या समाजाने आपली मुळे उत्तरकाळात कधी ब्राह्मण तर कधी क्षत्रियांशी भिडवली असली तरी वैदिक वर्णव्यवस्थेने मात्र त्यांना शुद्रच मानले आहे. तेराव्या शतकानंतर निर्माण झालेल्या अन्याय्य बलुतेदारी पद्धतीत बारा बलुतेदारांत त्यांचा समावेश केला गेलेला आहे. महाराष्ट्र शासनाने २००८ पासुन त्यांचा समावेश स्पेशल ब्यकवर्ड क्लासमद्धे केलेला आहे.
पुराणकथा बनवणारा एकमेव समाज!
आपल्याला आश्चर्य वाटेल पण बहुदा हा भारतातील एकमेव समाज आहे ज्यांची स्वत:ची ज्ञाति-माहात्म्ये व उदय सांगणारी किमान दोन पुराणे आहेत. यातुन समाजोत्पत्तीची येणारी कथा ही ख-या समाजेतिहासाला धरुनच आहे हे विशेष. अर्थात त्याला अद्भुततेची जोड आहेच. यापैकी पहिले पुराण म्हणजे देवांग पुराण. हे पुराण मुळ्चे संस्कृतातील आहे असे म्हणतात, परंतु आता त्याचे तेलगु, तमिळ आणि कानडी अनुवाद उपलब्ध आहेत. या पुराणानुसार शिवाने ब्रह्मदेवाला विश्वनिर्मितीची आज्ञा दिली. ब्रह्मदेवाने मनुमार्फत विश्व निर्माण केले व त्यानंतर तो शिवस्थानी विलीन झाला. परंतु मानव प्राण्यासाठी वस्त्रे निर्माण करणारे निर्माण केले गेलेच नाहीत. त्यामुळे मानवांना वल्कले व चर्म पांघरुन रहावे लागले. यामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी शिवाची ब्रह्मदेवामार्फत याचना केली. त्यामुळे शिवाने देवल ऋषीला निर्माण केले. देवल ऋषीने प्रथम विष्णुकडुन धाग्यांची प्राप्ती करुन घेवून देवांसाठी वस्त्रे वीणली. मग त्याने मयासुराकडुन मानवांसाठी वस्त्रे विणायला चरखा व हातमाग मिळवला...अशी ही पुराणकथा पुढे जाते व शिवाचे व देवांग समाजाचे माहात्म्य विषद करते.
दुसरे पुराण आहे श्री भगवान जिव्हेश्वर विजय (साळी माहात्म्य पुराण). हे पुराण मुळ अत्रि ऋषिंनी व्यासांच्या सांगण्यावरुन रचले व संत भानुदास खडामकर यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला.
या पुराणानुसार ब्रह्मदेव विष्णू व अन्य देवतागणासह भगवान शंकराकडे गेले व विनंती केली कि , `परमेश्वरा, आदिमायेकडून सॄष्टीची रचना झाली. तिच्या सत्व, रज, तम या त्रिगुणांपासून ब्रम्हा, विष्णू, महेशाची उत्पत्ती झाली. ब्रम्हाने ब्रम्हांडाची रचना करून, पंचमहाभूतांना निर्मून, देव, दानव, मानव व विभिन्न जीवकोटिंना जन्म दिला खरा, पण देव, दानव व मानव इतर प्राण्यासारखे नग्नावस्थेतच आहेत. त्यांच्या लज्जा रक्षणार्थ वस्त्राची निर्मिती झाली पाहिजे. हे महादेवा, वस्त्रानिर्मितीची व्यवस्था आपण करावी अशी विनंती करण्यास आम्ही आलो आहोत'तेव्हा महादेवांनी आदिमायेचे स्मरण केले.तिने प्रसन्न होऊन शंकरास म्हटले, `परमेश्वरा, वस्त्र निर्मिणार्‍या पुरूषाची आपण उत्पत्ती करा.'
मग शिवशंकराने आपल्या जिभेतुन एका दिव्य शिशुची निर्मिती केली...ते बालक म्हणजेच जिव्हेश्वर. साक्षात शिवपुत्र!
जिव्हेश्वर मोठा झाल्यानंतर मग आदीमायेच्या आदेशानूसार ब्रम्हा, विष्णु, महेश, नारद, शेष, नंदी आदी देवतांनी मागाच्या निरनिराळ्या भागांना रूप दिले. कैलासातील एका प्रशस्त जागेत मागाची स्थापना केली. ब्रम्हदेवाने कापसाची निर्मिती केली. कापसापासून सूत काढले गेले. सार्‍या देवांच्या कृपेने निर्मित त्या मागाची मनोभावे पूजा करून एका मंगल अशा सोमवारी शुभ मूहूर्तावर वस्त्र विणले गेले सर्वप्रथम कलात्मक वेलबुट्टीनी युक्त असा श्वेतवर्णाचा पीतांबर विणला गेला. अशा रितीने वीणकर समाजाचा आद्य पुरुष शिवाच्या जिव्हेतुन, म्हणजे खुद्द शिवपुत्रच, निर्माण झाला. या पुराणातील आठवा व नववा अध्याय म्हणजे विणकरांना विणकामातील सर्व प्रक्रिया समजावुन देणारा व विविध प्रकारची वस्त्रे कशी विणावीत याचे प्रशिक्षण देनारे म्यन्युएल आहे असे म्हटले तरी चालेल. एवढेच नव्हे तर तुतीची झाडे लावुन रेशीम कसे निर्माण करावे याचीही सविस्तर माहिती या पुराणात येते. शेतीचा अपवाद वगळता अन्य व्यवसायांबाबत प्राचीन काळी अशी रचना झाल्याचे दिसत नाही.
दोन्ही पुराणे आकाराने जवळपास अन्य पुराणांएवढीच मोठी असुन प्रासादिकही आहेत. आपल्या समाजाची उत्पत्ती एवढ्या विस्तृतपणे सांगणारी, अद्भुतरम्य घटनांनी भरलेली पुराणे फक्त कोष्टी/साळी या वीणकर समाजाची असावीत यावरुनही या समाजांची पुरातनता व त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो.
आणि ते खरेही आहे. इसवीसनपुर्व पंधराशेपासुन ते सन अठराशे पर्यंत या समाजाने अवघ्या जगाला आपल्या कुशल वीणकामाने वेड लावले. वीणकर समाजाचा हा प्रदिर्घ काळ म्हणजे भारताचा सुवर्णकाळच होता असे म्हनायला हरकत नाही. या सुवर्णकाळातील विणकर माहात्म्य आणि नंतर या समाजाचे कालौघात झालेले सामाजिक व आर्थिक अध:पतन, आजची ससेहोलपट याचा आढावा घेवूयात!
पोटजाती आणि सामाजिक क्रांती
विणकरांत प्रदेशनिहाय व जातीअंतर्गत अनेक पोटजाती आहेत. मुळचे हे सर्व एकाच विराट मानवी समुदायातुन व्यवसाय कौशल्यामुळे विणकर बनलेले हे लोक. पण पोटजातींत विवाह होत नव्हते. प्रत्येक पोटजात ही स्वतंत्र समजत आपापली पाळेमुळे काल्पनिक पुराण इतिहासांत शोधत होती. सर्व विणकर समाजाचे हंपी येथे जगद्गुरु पीठ आहे. सध्या श्री दयानंद पुरी महाराज या पीठाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी प्रागतिकतेचा वसा घेत बेटीबंदी तोडण्यासाठी अव्याहत प्रयत्न सुरु केले आहेत. सुजाण विणकर समाजही त्यांच्या आवाहनाला सकारात्मक पाठिंबा देत आहे ही एक नव्या समाज क्रांतीची सुरुवात आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
नग्नांना ज्यांनी आपल्या अपार कौशल्याने व प्रतिभेने वस्त्रे दिली, नटने-थटने शिकवले, जीवनात एक अनमोल वस्त्रानंद भरला...देशाच्या तिजो-या भरल्या त्यांनाच शूद्र ठरवत सामाजिक दर्जा घसरवणा-या वैदिक स्मृती व त्यांचे पालन करू लागलेल्या तत्कालिन सर्वच समाजाला दोष द्यावा तेवढा थोडाच आहे.
दुर्दैव हे कि आता पुन्हा ती हातमागावरील विलक्षण पोतांची घट्ट परंतु तलम विणीची वस्त्रे पहायला मिळनार नाहीत...
एका विराट देशी उद्योगाचा हा अंत वेदनादायक आहे हे नक्कीच!
-संजय सोनवणी
http://vinaykumarmadane.blogspot.in/
http://vinayherbalife.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).