मेरू पर्वत: विश्वाचे केन्द्रस्थान
हिंदू, जैन व बौद्ध पुराणकथांनी मेरुला विश्वाच्या केंद्रस्थानी वा पृथ्वीच्या नाभिस्थानी मानले आहे. म्हणूनच माळेच्या मध्यमण्याला लक्षणेने‘मेरुमणी’ म्हणतात. विविध पुराणकथांच्या मते जंबू वगैरे द्वीपे कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे त्याच्या भोवती आहेत. [→ जंबूद्वीप]. सूर्य, चंद्र व इतर ग्रह त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. त्याची उंची ८५ हजार योजने आहे. त्याच्या शिखरावर स्वर्गीय गंगा उतरते. त्याच्या शिखरावर ब्रह्मदेवाची नगरी असून उतारावर इंद्रादी अष्ट दिक्पालांच्या नगरी आहेत. तेथे देव, गंधर्व, सप्तर्षी इत्यादींचे वास्तव्य असते. रावणाची लंका हे मूळचे मेरुचेच एक शिखर होय. तो स्वर्गाला आधार देतो. त्याच्या खाली सप्तपाताल लोक असून त्यांच्या खाली विश्वाचा आधार वासुकी आहे. पांडवांचा अखेरचा प्रवास मेरुच्या दिशेने झाला. ‘मेरुसावर्ण’ व ‘मेरुसावर्णि’ या नावाच्या विशिष्ट मनूंनी या पर्वतावर तप केले होते. मेरुच्या अकरा कन्यापैकी मेरुदेवी ही नाभिराजाची पत्नी व जैनांचे आद्य तीर्थकार ऋषभनाथ किंवा आदिनाथ यांची माता होती. मेरुव्रत नावाचे जैनांचे एक व्रमही आहे. सोने, चांदी इत्यादींचा प्रतीकात्मक मेरु करुन तो दान देण्याचे हिंदूचेही एक व्रत आहे.
Comments
Post a Comment