सातवाहन राजे म्हणजे महाराष्ट्राचे भाग्यविधाते होत
सातवाहन राजे म्हणजे महाराष्ट्राचे भाग्यविधाते होत. त्यांनी महाराष्ट्रावर 450 वर्षे राज्य केले. त्यांच्या काळातील कला, नाणी, कोरीव लेख, वाङ्मय इ. विपुल पुरावा उपलब्ध आहे. असे असले तरी त्यांच्या इतिहासात अनेक कूटस्थळे आहेत. त्यांच्या प्राचीन वास्तू, कोरीव लेख व त्यांची राजधानी या सर्व महाराष्ट्रातील पुणे-नाशिक-औरंगाबाद या भागात मिळालेल्या आहेत. त्यांच्या घरण्याचा जनक राया सिमुक याच्या अस्तिवाची निशाणी देणारा फक्त एकच कोरीव लेख शिल्लक आहे. या राजाचा कोरीव पुतळा जुन्नरजवळील नाणेघाटात उभारलेला होता. त्या पुतळ्याच्या बैठकीवर राजाचे नांव कोरलेला लेख फक्त आज शिल्लक आहे. सिमुकाचा पुत्र पहिला सातकर्णी व त्याची राणी व राजपुत्र यांचीही तीच कथा आहे. सिमुकाचा धाटका भाऊ कृष्ण याने नाशिक येथे एक गुंफा खोदविली. नाणेघाट येथे असलेला राणी नागनिका हिच्या कोरीव लेखात तिचा पती पहिला सातकर्णी याच्या पराक्रमाचा वृत्तांत दिलेला आहे. त्याचा पुत्र दुसरा सातकर्णी याने पंचावन्न वर्षे राज्य केले व त्याच्याच कारकीर्दीत सांचीची अप्रतिम तोरणे कोरली गेली. या सर्व राजांची कारकीर्दीत इसवी सनाच्या सुरूवातीच्या आधीची आहे. परंतु त्यानंतर जवळजवळ एक शतकाचा इतिहास मात्र अजूनही अस्पष्ट आहे. सातवाहनांपैकी सर्वात थोर राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या कारकीर्दीचा काळ आधिक निश्चितपणे सांगता येतो. इ.स. 433 मध्ये क्षत्रप नहपान याचा पराभव करून दिले. शक क्षत्रप नहपान हा राजा कनिष्काने नेमलेला पश्चिम भारतातील राज्यप्रमुख किंवा मांडलिक राजा होता. गौतमपुत्राच्या आईने नाशिकच्या क्रमांक तीनच्या लेण्यात लिहून ठेवलेल्या वृतांतात त्याचे वर्णन शक-पहलव-आणि-यवन यांचे मर्दन करणारा (शकयवनपहलव निसूदन) व ज्याचे घोडे तिन्ही समुद्रांचे पाणी प्याले आहेत म्हणजेच ज्याचे सैन्य तिन्ही समुद्रांच्या सीमापर्यंत पोचलेले आहे (त्रिसमुद्रतोयपीतवाहन) असे केलेले आहे. यामध्ये कसलीही पोकळ बढाई नाही. त्याने विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडचा संपूर्ण प्रदेश जिंकून घेतलेला होता असे त्याच्या या प्रदेशात सर्वत्र सापडलेल्या नाण्यांवरून दिसून येते. आणि म्हणूनच एक कविराज म्हणतात, "उत्तरेकडे हिमालय व दक्षिणेकडे सातवाहन राजा यांच्यामुळे पृथ्वीचा तोल साधलेला आहे."
https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/620636691402083


Comments
Post a Comment