महाभारत आधीचे कि रामायण?

महाभारत आधीचे कि रामायण?
रामायण आधीचे असुन महाभारत नंतरचे आहे असे मानले जाते. याचे प्रमुख कारण असे कि खुद्द महाभारतात रामायणकथा सविस्तरपणे येते, तशी भारतकथा रामायणात येत नाही. पण महाभारतात ४थ्या शतकापर्यंत एवढी भर पडली आहे कि चक्क भगवान बुद्धसुद्धा महाभारतात डोकावतात. मग म्हणुन महाभारत बुद्धोत्तरकाळानंतरचे आहे असे समजायचे का?
तर ते तसेही नाही. महाभारत मुळातील जय नावाचे वीरकाव्य होते. ते मुळात फक्त 8800 श्लोकांचे होते. रामायण या काव्याचे मुळ नावही "पौलत्स्यवध" असे असुन ते एक गीतिकाव्य वा वीरकाव्य या स्वरुपाचे होते आणि त्यातही ३-४ थ्या शतकापर्यंत भर पडत राहीली. अशी मान्यता आहे कि रामायण आणि महाभारतकाळात किमान ५०० ते १००० वर्षांचे अंतर आहे. "वैदिक संस्क्रुतीचा इतिहास" लिहितांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही, महाभारतकाळात रामायणकाळापेक्षा अधिक गुंतागुंतीचे समाजकारण झाले असल्यामुळे रामायण आधी झाले असावे असे मानतांना दिसतात. काही विद्वान तर दोन्हीही काल्पनीक कथा असल्याने दोहोंनाही ऐतिहासिक महत्व देता येत नाही असेही प्रतिपादित करतांना दिसतात.
दोन्ही काव्ये ऐतिहासिक कि काल्पनिक या वादात न पडता मी कोणते काव्य आधीचे असु शकेल यावर येथे विचार मांडत आहे.
माझ्या मते महाभारतकाळ हा आधीचा असुन रामायणकाळ नंतरचा आहे. त्यासाठीचे पुरावे खालीलप्रमाणे:
महाभारतात बहुपतिकत्व, बहुपत्नीत्व आणि नियोगप्रथा सर्रास आहे. किंबहुना पांडवांची जी बाजु येते त्यात तर ती अधिकच स्पष्ट दिसते. उदा:. कुंतीने नियोगानेच विवाहपुर्व आणि विवाहोत्तर काळात पतीशिवाय मुले प्रसवली. माद्रीने सुद्धा. त्यांचे पित्रुत्व सुर्य-इंद्रादी देवतांना दिले गेले असले तरी ती उत्तरकालात केली गेलेली सारवासारव आहे हे स्पष्ट आहे. द्रौपदीने बहुपतीकत्वाची चाल पाळलेली आहे. त्याची अनैतिकता उत्तरकाळात जानवल्याने या बहुपतिकत्वाची पाच वेगवेगळी समर्थने महाभारतात आदिपर्वात येतात. म्हनजे बहुपतीकत्व/नियोगविधी हे ज्या काळात समाजमान्य उरलेले नव्हते त्या काळात या स्पष्टीकरणकथा घुसवण्यात आल्या आहेत.
समाजशास्त्रीय अंगाने पाहिले तर समाजाचा विकास हा स्त्रीसत्ताकाकडुन पुरुषसत्ताकाकडे झालेला दिसतो. स्त्रीसत्ताकात स्त्रीयांचे स्वातंत्र्य अमर्यादित होते. कोनाशी संबंध ठेवावेत, कोणाकडुन संतती उत्पन्न करावी वा किती पती ठेवावेत याचे स्वातंत्र्य स्त्रीयांना होते. द्रौपदी पाच पती असतांनाही कर्णालाही सहावा पती मानण्यास तयार होतीच. म्हनजे कुंती, माद्री व द्रौपदी या स्त्रीसत्ताक संस्थेचे प्रतिनिधित्व करना-या व स्त्रीसत्ताकतेकडुन पुरुषसत्ताकतेकेडे होत असणा-या संक्रमनकाळातील स्त्रीया होत. पांडवांनी त्याच वेळीस अनेक स्त्रीयाही केल्या होत्या यावरुन हे सिद्ध होते.
कौरवांचा एक पुर्वज भरताचा जन्म हा दुष्यंत-शकुंतलेच्या एकमेव मिलनानंतर तीन वर्षांनी झाला असे महाभारत सांगते. या विसंगतीकडे लक्ष वेधायचे कारण म्हनजे पुर्वीच्या बहुपतीकत्व प्रथेची उदाहरणे महाभारतकारांना द्यायची नव्हती असे मला वाटते. प्रस्तुत काव्याचा हेतु कौरव-पाडवांतील कलह हा असल्याने त्यांना मात्र पांडवाच्या बाजुने असलेली प्रचलीत बहुपतीकत्व आणि त्याच वेळीस बहुपत्नीकत्व लपवता येणे शक्य नसल्याने त्याभोवती मित्थके रचत त्या प्रथेचे अपवाद म्हणुन समर्थन केले गेलेले दिसते.
कौरव मात्र एकपत्नीकत्वाचे (काही अंशी बहुपत्नीत्वाचे) समर्थक घटक दिसतात. ध्रुतराष्ट्राला एकच पत्नी आहे व ती म्हनजे गांधारी. दुर्योधनालाही महाभारतातुन दिसनारी एकच पत्नी आहे...अन्य कौरवांच्या पत्न्यांची नावे सहसा आढळतही नाहीत. परंतु कौरव हे पुरुषसत्ताक पद्धतीकडील वाटचाल करणारे-पाळणारे होत एवढे मात्र म्हणता येते.
रामायण मात्र जेंव्हा बहुपत्नीकत्व रुढ झाले होते, म्हनजेच पुरुषसत्ताकत्व प्रचलित झाले होते त्या काळात घडलेले दिसते.
रामायनातील (सध्याच्या उपलब्ध असलेल्या) प्रतींतील बालकांड व उत्तरकांड प्रक्षिप्त आहेत हे आता असंख्य पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. मुळातील हे एक वीरकाव्य फक्त राम-रावण युद्धाचे वर्णन करणारे होते. नंतर त्यातही भर पडत आजचे रामायण बनलेले आहे. असे असले तरी त्यातील सामाजिक अवस्था काय होती याकडे मी आपले लक्ष वेधु इच्छितो. ती अशी:
१. रामायणात पुरुषसत्ताक पद्धती स्थिर झालेली दिसते, तरीही स्त्रीसत्ताकतेचे अत्यंत अवशिष्ट असे रुपही आपण कैकयी प्रकरणात पाहु शकतो.
२. स्त्रीयांना दुय्यम स्वरुप मिळाल्याचे रामायनात दिसते. उदा. रामाला वनवासात जातांना सीतेला सोबत नेण्याची इच्छआ नव्हती. उलट तिने भरताच्या आद्न्येखाली रहात अन्य धाकट्या भावांशी तिने भ्रात्रुभाव ठेवावा अशीच रामाची इच्छा दिसते. एवढेच नव्हे तर रावणावर विजय मिळवल्यानंतर "मी रावणाला जिंकले ते मआझ्यावरील कलंक मिटविण्यासाठी...तु वर्षभर रावणासोबत राहिली आहेस...आता तु कोनाचीही संगिनी...शत्रुघ्न-ते भरताची, अगदी बिभिषणाचीही... स्वेच्छेने होवु शकतेस..." अशा अर्थाचे उद्गार रामाने काढलेले आहेत. पहिली अग्निपरिक्षा सीतेला तेथेच द्यावी लागली हे सर्वविदित तर आहेच...पण पुन्हा तिला तशीच अग्निपरिक्षा अयोध्येला गेल्यानंतर द्यावी लागलेली आहे.
३. यातील प्रक्षेप लक्षात घेवुनही एक बाब महत्वाची आहे ती ही कि येथे सर्वस्वी पुरुषप्रधान संस्क्रुतीचे वर्चस्व दिसते. स्त्रीमहत्ता ही धार्मिक द्रुष्ट्या "पती-परायण स्त्री" एवढ्यापुरती सीमित झालेली दिसते. एवढेच नव्हे तर शुर्पनखेचे जे उपहासात्मक रुप रामायणात येते...तेही पुरुषवर्चस्ववादी भुमिकेचे एक रुपक आहे. स्त्रीयांना हवा तो जोडीदार निवडन्याचा एक स्त्रीसत्तअक पद्धतीचा हक्क होता तो शुर्पनखा प्रकरणात नाकारला गेलेला स्पष्ट दिसतो. तिचे नाक कापने, उपहास करने हे स्त्री-शक्ती अवमानाचे उदाहरण रामायणात दिसते... याच उलट महाभारतात हिडिंबेने करार पद्धतीने का होईना, भीमासंदर्भात आपल्या स्त्रीसत्ताकतेची महत्ता जाग्रुत ठेवलेली दिसते आणि पांडवांचा त्याला आक्षेप नव्हता हे आपण मुळ महाभारतात पाहु शकतो.
यात अजुन उदाहरनांची भर घालता येईल. महाभारत हे स्त्रीसत्ताक (पांडव) विरुद्ध पुरुषसत्ताक (कौरव) पद्धतींतील द्वंद्व असेल तर रामायण हे केवळ पुरुषसत्त्ताक पद्धतीचे समर्थन आहे असे म्हणावे लागते. रामायनातील उत्तरकांड प्रक्षिप्त आहे तसेच बालकांडही...या विद्वत्मताशी मी सहमत आहेच. परंतु रामायण हे पुरुषसत्ताक पद्दह्तीचे समर्थन करते हे मत नाकारता येत नाही. याउलट महाभारतात स्त्रीसत्ताक विरुद्ध पुरुषसत्ताक या सामाजिक संघर्षाची स्पष्ट उदाहरणे अधिक असल्याने आधी महाभारत (मग ते काल्पनिक काव्य का असेना..) मग रामायण (काल्पनिक का असेना..) घडले आहे, वा लिहिले गेलेले आहे असे मला वाटते.

Sanjay Sonawani

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).