व्रात्य क्षत्रीय
जैन धर्म म्हटला म्हणजे वर्धमान महावीरांचं नाव आठवतं. महावीर हे गौतम बुद्धांच्या समकालीन असून, बुद्धांपेक्षा वयाने ज्येष्ठ होते. विशेष म्हणजे हे दोन्ही धर्मपुरुष क्षत्रीय(मुळ वंश :पशुपालक) होते. तथापि, त्यांनी वैदिक परंपरेला विरोध केल्यामुळं आणि मुळात म्हणजे वर्णव्यवस्थेच्या पावित्र्याला आणि प्रतिष्ठेला आव्हान दिल्यामुळं वैदिक परंपरेत त्यांना कनिष्ठ दर्जाचं, कमअस्सल क्षत्रीय मानण्यात येऊ लागलं. त्याचा खुलासा इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या लेखनातून होतो. राजवाडे या दोघांना व्रात्य क्षत्रीय मानतात. इतकंच नव्हे तर, त्यातही महावीर नट आणि बुद्ध शक (हे दोन्हीही व्रात्य क्षत्रीयांचे उपप्रकार) असल्याचं सांगतात. स्वतः राजवाडे हे वैदिक धर्माचे कट्टर अभिमानी असल्यामुळं त्यांनी याबाबतीत परंपरेची री ओढणं स्वाभाविकच म्हणायला हवं.
यासंदर्भात ‘व्रात्य’ ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. मुळातल्या वैदिक त्रैवर्णिक समाजातली व्यक्ती जेव्हा काही कारणानं वैदिक धर्मातल्या आवश्ययक संस्कारांपासून वंचित राहतं, तेव्हा तिला ‘व्रात्य’ असं म्हटलं जातं. या संस्कारांतला मुख्य संस्कार म्हणजे अर्थातच उपनयनाचा. उपनयनाच्या संस्कारात गायत्री मंत्राच्या माध्यमातून सूर्योपासना केली जाते. ज्याला हा संस्कार लाभला नाही, त्याला सावित्रीपतित म्हणजेच व्रात्य म्हटलं जातं.
अशा व्रात्यावर पुन्हा संस्कार करून त्याला परत वैदिक धर्मात घेण्याची लवचिकता पूर्वी वैदिक धर्मात होती. या संस्काराला ‘व्रात्यस्तोम’ असं नाव आहे. मात्र मुळातच वैदिक किंवा आर्य नसलेल्या व्यक्तीला आर्य करण्यासाठी या संस्काराचा उपयोग होत नसे. कारण मुळात असं करण्याची तरतूद वैदिक धर्मात नव्हती.
Comments
Post a Comment