गांधी विरुद्ध आंबेडकर विरुद्ध सावरकर(सदानंद मोरे)


गांधी विरुद्ध आंबेडकर विरुद्ध सावरकर(सदानंद मोरे)
पश्‍चिम आशियात उदयाला आलेल्या तीन सेमिटिक धर्मांमधला कालक्रम सर्वज्ञात आहे. यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम या क्रमानं हे धर्म निर्माण झाले. भारताच्या धर्मजीवनातल्या प्राचीन धर्मांचा विचार केला, तर असं दिसतं की यज्ञयागप्रधान वैदिक धर्म प्राचीन असला, तरी वैदिक धर्माच्या बरोबरीनंच समांतर अशी श्रमणपरंपरा अस्तित्वात होती. या परंपरेला वैदिकांचा यज्ञकेंद्रित हिंसाचार मान्य नव्हता. त्यांचा कल अहिंसा आणि संन्यास-परित्याग यांच्याकडं होता. अगोदरचा जैन आणि नंतरचा बौद्ध हे धर्म श्रमणपरंपरेतले होत.

जैन धर्म म्हटला म्हणजे वर्धमान महावीरांचं नाव आठवतं. महावीर हे गौतम बुद्धांच्या समकालीन असून, बुद्धांपेक्षा वयाने ज्येष्ठ होते. विशेष म्हणजे हे दोन्ही धर्मपुरुष क्षत्रीय((मुळ वंश :पशुपालक)  होते. तथापि, त्यांनी वैदिक परंपरेला विरोध केल्यामुळं आणि मुळात म्हणजे वर्णव्यवस्थेच्या पावित्र्याला आणि प्रतिष्ठेला आव्हान दिल्यामुळं वैदिक परंपरेत त्यांना कनिष्ठ दर्जाचं, कमअस्सल क्षत्रीय मानण्यात येऊ लागलं. त्याचा खुलासा इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या लेखनातून होतो. राजवाडे या दोघांना व्रात्य क्षत्रीय मानतात. इतकंच नव्हे तर, त्यातही महावीर नट आणि बुद्ध शक (हे दोन्हीही व्रात्य क्षत्रीयांचे उपप्रकार) असल्याचं सांगतात. स्वतः राजवाडे हे वैदिक धर्माचे कट्टर अभिमानी असल्यामुळं त्यांनी याबाबतीत परंपरेची री ओढणं स्वाभाविकच म्हणायला हवं.
यासंदर्भात ‘व्रात्य’ ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. मुळातल्या वैदिक त्रैवर्णिक समाजातली व्यक्ती जेव्हा काही कारणानं वैदिक धर्मातल्या आवश्‍यक संस्कारांपासून वंचित राहतं, तेव्हा तिला ‘व्रात्य’ असं म्हटलं जातं. या संस्कारांतला मुख्य संस्कार म्हणजे अर्थातच उपनयनाचा. उपनयनाच्या संस्कारात गायत्री मंत्राच्या माध्यमातून सूर्योपासना केली जाते. ज्याला हा संस्कार लाभला नाही, त्याला सावित्रीपतित म्हणजेच व्रात्य म्हटलं जातं.
अशा व्रात्यावर पुन्हा संस्कार करून त्याला परत वैदिक धर्मात घेण्याची लवचिकता पूर्वी वैदिक धर्मात होती. या संस्काराला ‘व्रात्यस्तोम’ असं नाव आहे. मात्र मुळातच वैदिक किंवा आर्य नसलेल्या व्यक्तीला आर्य करण्यासाठी या संस्काराचा उपयोग होत नसे. कारण मुळात असं करण्याची तरतूद वैदिक धर्मात नव्हती.

वैदिक धर्म हा मुख्यत्वे वर्णाश्रमव्यवस्थेवर आधारित होता. जैन, बौद्ध, आजीवक अशा श्रमणांनी ही व्यवस्था पूर्णतः नाकारली, असं म्हणता येणार नाही. तथापि, त्यांनी या व्यवस्थेत असे काही बदल घडवून आणले, की ज्यांच्यामुळं या व्यवस्थेचा फायदा पूर्वी ज्यांना होत असे, तो आता तितका होईनासा झाला.
श्रमणपरंपरा अहिंसेची पुरस्कर्ती असल्यामुळं तिनं वैदिकांना यज्ञयागांत विरोध केला. वैदिकी म्हणजे यज्ञयागात पशुबळीमुळं होणारी हिंसा. मात्र, ही हिंसा हिंसाच नाही, असा पवित्रा वैदिकांनी घेऊन आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला खरा; पण तो पुरेसा यशस्वी झाला नाही. त्यामुळं वैदिक धर्मीयांची चिडचिड अधिकच वाढली. यज्ञयाग नाकारणं, हा वैदिक धर्माच्या मुळावरच घाला होता.

यासंदर्भात आश्रमव्यवस्थेचाही विचार केला पाहिजे. वैदिक धर्मात मुळात, व्यक्तीनं अखेरपर्यंत यज्ञयागादी कर्म करत राहिलं पाहिजे, असा आग्रह होता. श्रमणपरंपरेला हा आग्रह मुळीच मान्य नव्हता आणि पूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे श्रमणपरंपरेतले लोक या वैदिक परंपरेतल्या लोकांचे भाऊबंदच होते. ते दुसऱ्या समाजातले असते, तर त्यांना पूर्णपणे विरोध करणं किंवा त्यांच्याकडं पूर्ण दुर्लक्ष करणं शक्‍य झालं असतं. इथं तसं करता येणार नव्हतं. कारण वैदिकांपैकी काही लोकांना श्रमणपरंपरेचं आकर्षण वाटून ते तिचा स्वीकार करणं अगदीच शक्‍य होतं आणि ते यांना परवडलं नसतं म्हणून त्यांनी आपल्या परंपरेप्रमाणे, एखाद्यानं दोनतृतीयांश भाग व्यतीत केल्यानंतर उर्वरित भाग श्रमणांप्रमाणे संन्यस्त जीवन जगू शकेल अशी मुभा किंवा सवलत त्यांनी दिली. त्यातूनच वैदिक धर्मात आश्रमव्यवस्था विकसित झाली.
मात्र, श्रमणांची काही तत्त्वं आपल्या धर्मात सामावून घेताना वैदिकांनी वर्णविचार सोडला नव्हता.

अशा प्रकारे कर्म सोडून संन्यास घेण्याचा अधिकार चौथ्या शूद्र वर्णाला नाकारून आत्मचिंतनासाठी आवश्‍यक असलेल्या या अवस्थेपासून दूर ठेवण्यात आले. क्षत्रीय आणि वैश्‍य यांनाही असं काही करण्यापासून निरुत्साहित करण्यात येऊ लागलं! स्त्रियांना असा अधिकार मिळणं दुरापास्तच होतं.
या पार्श्‍वभूमीवरच आपल्याला जैन आणि बौद्ध धर्मांच्या उदयाचं आकलन करून घेणं शक्‍य होईल. हेगेल आणि मार्क्‍स यांनी विकसित केलेली विरोधविकासी पद्धती (डायलेक्‍टिक्‍स) लक्षात घेऊन असं म्हणता येईल की वैदिक परंपरेला सिद्धान्त (थिसिस) मानलं, तर श्रमणांच्या जैनपरंपरेला प्रतिसिद्धान्त (अँटीथिसिस) मानता येईल.

अशीच प्रक्रिया वैदिकांच्या अंतर्गत कशी घडली, याचाही शोध घेता येईल. वैदिकांच्या हिंसक कर्मकांडाच्या सिद्धान्ताला नाकारणारा प्रतिसिद्धान्त उपनिषदांनी मांडला. कर्म आणि कर्मसंन्यास यांच्यातलं हे द्वंद्व श्रमणपरंपरेमुळं वैदिक परंपरेत प्रविष्ट झालं.
विरोधविकासी विचारपद्धतीत सिद्धान्त, सिद्धान्ताला नकार देणारा प्रतिसिद्धान्त आणि प्रतिसिद्धान्तासाठी नकार देऊन त्या दोघांचा समन्वय (सिंथेसिस) घडवण्यात येतो. वैदिक परंपरेच्या अंतर्गत विचार केला तर वैदिक कर्मकांड हा सिद्धान्त, औपनिषदिक कर्मसंन्यास हा प्रतिसिद्धान्त आणि त्यालाही नकार देणारा भगवद्‌गीतेतला निष्काम कर्मयोग हा समन्वय अशा प्रकारचं प्रतिपादन जुन्या पिढीतले विचारवंत प्रा. दे. द. वाडेकर यांनी केले आहे.

आता याच प्रकारे वैदिक आणि श्रमणपरंपरांचा विचार केला, तर असं म्हणता येईल, की वैदिक धर्मातल्या कर्मकांडाच्या व हिंसेच्या अतिरेकाला दुसऱ्या टोकाला जाऊन श्रमणांमधल्या जैन धर्मानं तितक्‍याच निकरानं नकार दिला व विरोध केला. म्हणजे वैदिक परंपरेच्या सिद्धान्ताचा जैनपरंपरा हा प्रतिसिद्धान्त होता. स्वतः बुद्ध आणि महावीर यांच्यामधल्या वैयक्तिक पातळीवरच्या संबंधाचा व संपर्काचा मुद्दा बाजूला ठेवला, तरी परंपरा या रूपानं जैनविचार - जो ऋषभदेव आदिनाथांपासून पार्श्‍वनाथांपर्यंतच्या २३ तीर्थंकरांनी विकसित केलेला होता - बुद्धांच्या समोर होताच. (विशेष म्हणजे, स्वतः महावीरांसह हे सर्व २४ तीर्थंकर क्षत्रीय वर्णाचे होते. बुद्धसुद्धा क्षत्रीयच. इतकंच काय तर, उपनिषदांमधल्या आत्मविद्येचे प्रवर्तकसुद्धा क्षत्रीयच असल्यामुळं प्राचीन भारतीय परंपरेतला तात्त्विक संघर्ष मुख्यत्वे ब्राह्मण आणि क्षत्रीय यांच्यातला संघर्ष असल्याचं अनेकांना वाटतं; पण तो मुद्दा वेगळा.) बुद्धांच्या काळी अनेक धर्ममतं प्रचलित असली, तरी त्यात वैदिक आणि जैन हेच दोन प्रवाह सर्वांत अधिक प्रभावशाली होते, हे लक्षात घ्यायला हवं.

वैदिक धर्मासमोर उघड आव्हान उभं करणाऱ्या बुद्धांनी जैन धर्माला नकार दिला, असं सुटं व स्वतंत्र विधान केलं, तर कित्येकांच्या भुवया उंचावतील, हे मला ठाऊक आहे. तथापि, हा सर्व एका दीर्घ प्रक्रियेचा भाग आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तीन विचारांची उत्क्रांती सिद्धान्त, प्रतिसिद्धान्त आणि समन्वय अशी झाली, हे समजून घेतलं, तर भुवया उंचावण्याचं कारण उरत नाही. या त्रिकांडात्मक प्रारूपातल्या (मॉडेल) (model) पहिल्या अवस्थेला दुसऱ्या अवस्थेनं नाकारलं, याचा अर्थ पहिली अवस्था पूर्णपणे संपुष्टात आली किंवा नाहीशी झाली, असा होत नाही. तिसऱ्या अवस्थेपुढं पहिली व दुसरी अशा दोन्ही अवस्था एकमेकीशी संघर्ष करत उपस्थित असू शकतात. वैदिक आणि जैन या दोन्ही परंपरांचा संघर्ष बुद्धांच्याच समोर चाललेला त्यांना प्रत्यक्ष अनुभवास येत होता. ते स्वतः श्रमणपरंपरेशी नातं सांगणारे होते. तथापि, वैदिक परंपरेला नकार देताना जैनपरंपरेनं दुसरं टोक गाठलं आहे, असंच त्यांना वाटलं असणार व त्यातूनच जैनपरंपरेचा प्रतिसिद्धान्त नाकारून त्यांचा स्वतःचा (बौद्ध) मार्ग समन्वयरूपानं सिद्ध झाला असणार, अशी अटकळ बांधता येते.

या मुद्द्याची थोडी तपशीलवार चर्चा करायला हवी ः
पहिल्यांदा या तिघांच्या सत्ताशास्त्राचा (मेटॅफिजिक्‍स) विचार करू या. वैदिक धर्म हा या क्षेत्रात एकमेवाद्वितीय ब्रह्मवादाचा पुरस्कार करणारा असल्याचं प्रसिद्ध आहे. (त्यांचा अंतर्गत प्रतिवाद करणारं द्वैतीदर्शनही होतं; पण तो मुख्य प्रवाह कधीच झाला नाही. निदान जैन बौद्धांच्या लेखी तर नाहीच नाही.) याउलट जैनविचार अनेक वस्तू मानणारा आहे. या दोन विचारांचा समन्वय कसा घडवता येईल? बुद्धांनी सरळ अशी भूमिका घेतली, की अशा सत्ताशास्त्रीय समस्यांमध्ये त्यांना स्वारस्य नाही. त्याबाबत त्यांनी चक्क मौन धरणं पसंत केलं आणि त्यांच्या या सुप्रसिद्ध मौनाचा अन्वयार्थ अभ्यासक अजूनही लावतच आहेत. मला वाटतं, मौन हासुद्धा समन्वयाचा एक मार्गच म्हणायला हवा.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा आचारधर्माचा आहे. वैदिक परंपरा ही हिंसेला उत्तेजन देणारी होती, याबाबत दुमत व्हायचं कारण नाही. या हिंसेला नकार दिला तो जैनांनी; परंतु हा नकार टोकाचा होता. जैनदर्शनानं जीवसृष्टीचा अत्यंत सूक्ष्म रीतीनं शोध घेतला व या जीवांची हिंसा आपल्या हातून होऊ नये, यासाठी अत्यंत काटेकोर नियम घालून दिले. या नियमात सर्वसामान्य श्रावकांसाठीचे नियम विशिष्ट पात्रता अंगी बाणवलेल्या श्रमणांसाठीच्या नियमांपेक्षा सोपे असले, तरीही सर्वसाधारण माणसाचा विचार केला तर तेसुद्धा अवघडच म्हणावे लागतात.
इतर सजीवांची हिंसा टाळण्याबरोबरच जैनपरंपरेत आत्मक्‍लेशावर, देहदंडावर, त्यागावरही अतिरिक्त भर होता. गौतम बुद्धांनी याही बाबतीत सर्वसामान्य मनुष्य पुढं ठेवून त्याला पेलू-परवडू शकेल इतक्‍याच प्रमाणात अहिंसेचा आणि त्यागाचा उपदेश केला.
हजारो वर्षांची परंपरा असलेल्या जैन श्रमणधर्माला मागं टाकून बौद्धांचा श्रमणधर्म का पुढं गेला, याचं एक कारण जैनांची आचारतत्त्वं सर्वसाधारण माणसाच्या आटोक्‍यात न येणारी होती; परंतु बौद्धांची तत्त्वं आटोक्‍यातली होती, हे आहे.

हिंसा आणि अहिंसा यांच्याविषयीच्या चर्चेत अगदी अलीकडचा संदर्भ द्यायला हरकत नसावी. ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी लढे उभारले, त्यांच्यात महात्मा गांधी यांचं नाव अग्रगण्य ठरतं. विशेष म्हणजे गांधींनी आपला लढा अहिंसात्मक मार्गानं चालवला.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला कल बौद्ध धर्माकडं असल्याचं स्पष्ट केलं होतं. राजकारणात आंबेडकर हे गांधींचे विरोधक होते. आता आंबेडकर जर बौद्ध मार्गाची भलावण करत असतील, तर त्यांना बौद्धांची अहिंसा मान्य करावी लागणार; पण मग त्यांचे गांधींशी मतभेद कुठं उरतात?
आंबेडकरांना आपली भूमिका स्पष्ट करणं भाग होतं. ती त्यांनी केलीच. त्यानुसार गांधींची अहिंसा ही बुद्धांची अहिंसा नव्हे; पण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली अहिंसा ही बुद्धांची अहिंसा होय.

आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना आंबेडकरांना तुकोबांचा आधार घ्यावा लागला. बाबासाहेब सांगतात ः ‘गांधींची अहिंसा ही एकांगी असून, बुद्धांची अहिंसा परिपूर्ण आहे. तुकोबांनी ‘दया तिचे नाव भूतांचे पालन। आणिक निर्दालन कंटकांचे।।’ असं म्हटलं आहे.’ बाबासाहेब पुढं सांगतात ः ‘तुकोबांची अहिंसा ही बुद्धाचीच अहिंसा आहे. प्राणिमात्रांवर दया करणं हे अहिंसेचं एक अंग आहे; परंतु प्राणिमात्रांच्या जगण्याच्या आड येणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून काढणं ही अहिंसेचीच दुसरी बाजू आहे, ती हिंसा नव्हे. या दोन्ही बाजूंचा समावेश असला, तरच अहिंसा परिपूर्ण ठरते.’

इथं दोन मुद्दे उपस्थित होतात. जैनांनी कधीच हिंसेला मान्यता दिली नव्हती का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आंबेडकरांना बुद्धांची अहिंसा परिपूर्ण वाटत असली, तरी स्वातंत्र्यवीर सावरकरप्रभृती हिंदुत्ववादी विचारवंतांनी ‘बौद्धांच्या अहिंसेमुळंच देशातल्या क्षात्रवृत्तीचा क्षय झाला व त्यामुळंच हा देश परकीय आक्रमकांना बळी पडला,’ अशी मांडणी केली. त्यांना बुद्धांच्या अहिंसेत हिंसेला पुरेसं स्थान व वाव नाही, असंच वाटत असणार, हे उघड आहे.





Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).