सुंबरान मांडिलं... - डॉ. सुधीर तारे (वृत्तपत्र-सकाळ/ दिनांक ३ नोव्हेंबर २०१०)


सुंबरान मांडिलं... - डॉ. सुधीर तारे (वृत्तपत्र-सकाळ/ दिनांक नोव्हेंबर २०१०)
धनगर म्हणजे मेंढपाळ. पारंपरिक शिक्षणापासून हा समाज वर्षानुवर्षे वंचित होता. तरीसुद्धा आपल्या कुलदैवतांची आराधना, प्रार्थना करणाऱ्या "ओव्या' मौखिक रूपात एका पिढीकडून पुढच्या पिढीला शिकविल्या गेल्या. त्या ओव्या "मौखिक वाङ्मय' या सदरात मोडतात. छापील लेखन-साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही. कारण "निरक्षरता'! तरीही तोंडी, पाठांतराद्वारा या सांस्कृतिक ठेव्याचे जतन हजारो वर्षे धनगरांनी केले, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.
आजच्या "साक्षर' पिढीला "मौखिक वाङ्मय' हा शब्द कदाचित खटकणारा वाटेल, तरीही हा शब्दप्रयोग योग्य आहे, असे मला ठामपणे नमूद करावेसे वाटते. धनगर समाज महाराष्ट्रातील सर्वात मोठा मेंढपाळ, पशुपालक समाज आहे. काही धनगर शेतीसुद्धा करतात. घोंगड्या विणणाऱ्यांना "सनगर' म्हणतात.
मेंढ्या पाळणाऱ्यांना "हाटकर' म्हणतात. आपल्या मेंढ्यांना बरोबर घेऊन धनगर दिवाळीनंतर चाऱ्यासाठी भटकंती करीत असत. पावसाळ्याच्या सुमारास आपापल्या गावी परतत असत. पुढे पावसाळी चार महिने गावातच राहत असत. "खेळ' हा त्यांचा मोठा उत्सव कुलदैवतांच्या आराधनेसाठी साजरा केला जातो. प्रामुख्याने खंडोबा (जेजुरीचा), धुळोबा (विडणीचा), बिरोबा (आरेवाडीचा), मायाक्का (चिंचणीची), भिवाई (कांबळेश्वरची), शिंग्रुबा (खंडाळ्याचा)... या देव-देवतांची आराधना, स्मरण करण्यासाठी या "ओव्या' मराठीत म्हटल्या जातात. ओवीच्या सुरवातीला सूर्य, चंद्र, पृथ्वी (जमीन), नद्या, मेघ (ढग) यांना नमन करून कुलदेवतांचे स्मरण केले जाते. ढोल झांजांच्या तालावर, ठेक्यात ठसक्यात या ओव्या गायल्या जातात. बऱ्याच वेळा बासुरी (पावा) सुद्धा वाजवली जातो.
जात्यावर गायल्या जाणाऱ्या ओव्यांपेक्षा किंवा ज्ञानेश्वरीतील ओव्यांपेक्षा धनगरी ओव्या भिन्न आहेत, वेगळ्या आहेत, हा महत्त्वाचा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. धनगरी ओवीचे ढोबळमानाने दोन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे "गाणे' (पद्यरूपात सादर).
हा भाग "गाऊन' दाखविला जातो. दुसरा भाग म्हणजे "कथा'! हा भाग गोष्टीरूपाने (गद्यरूपात) सांगितला जातो. गाणारे वेगळे असतात. कथा सांगणारे वेगळे असतात. कथेच्या भागाला "सपादनी' म्हणतात. गाण्यातील माहितीच कथारूपाने पुन्हा पुन्हा सांगितली जाते. ओवीची "गायलेली' प्रत्येक ओळ किमान दोन वेळा, तर कधी कधी चार वेळा सलग म्हटली जाते. तीच ओळ दुसरा, तिसरा, चौथा आळीपाळीने म्हणतो. पहिल्याची चूक झाली असेल तर पुढचा गाणारा ती चूक सुधारून घेतो. कथा सांगणारेसुद्धा "मागच्याची चूक' सुधारून घेतात. प्रत्येक वेळेला "चाल' बदलून नव्या चालीत गाणे म्हणण्याची कथा सांगण्याची प्रथा धनगरांनी जपली आहे. तसेच प्रत्येक वेळी "आवाज' बदलून गाणे कथा सांगितली जाते, हे विशेष! आणि हीच खरी आगळी-वेगळी ओळख आहे धनगरांच्या "मौखिक वाङ्मयाची' म्हणजेच "ओव्यांची'! या लेखात आपण तीन दैवतांची माहिती घेऊ, म्हणजे बिरोबा, धुळोबा आणि शिंग्रुबा यांची!
मुख्य दैवत बिरोबा!
धनगरांचे मुख्य दैवत आहे "बिरोबा' आणि त्यांची आई सुरावंती. या ओव्यांमध्ये बिरोबांच्या आईची माहिती तपशीलवार सांगितली जाते. तसेच बिरोबांची जन्मकथासुद्धा सांगितली जाते. यानंतर बिरोबांच्या मानलेल्या बहिणीची म्हणजे पायक्काची आणि बिरोबांच्या पत्नीची म्हणजे कामाबाईची माहिती "गाण्या' "कथे'तून सांगितली जाते.
दुसरे दैवत धुळोबा!
धनगरांचे दुसरे दैवत धुळोबा. धुळोबांच्या आणि बिरोबांच्या कथांमध्ये एक समानता आहे. दोघेही एका विशिष्ट पद्धतीनेच जीवन जगले... म्हणजे... जन्म, बालपण, तारुण्य, विवाह, गृहस्थी जीवन आणि दुष्टांचा नाश! परंतु या दोन कथांमध्ये महत्त्वाचा भेदसुद्धा आहे.
धुळोबांच्या ओव्यात देव भक्ताला भेटायला येतो! धुळोबांच्या ओव्यात धुळोबा आणि भिवाई (नदी-देवता) या बहीण-भावांच्या नात्यावर जास्त जोर दिलेला आढळतो.
तिसरे दैवत "शिंग्रुबा'
मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा "रस्ता' कसा कोठे तयार करायचा रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रुबा! धनगरांची स्वतःची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा शिंग्रुबाच्या ओव्यांतून सांगितली जाते. शिंग्रुबा वर्षानुवर्षे या घाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेंढरं चरायला नेत असे. त्यामुळे येथील जमिनीची, कड्याकपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची दगडी-टणकपणाची खडा न्खडा माहिती त्याला होती. ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली. त्या माहितीच्या आधारेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून, सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला, बोगदे निर्माण केले गेले मुंबई-पुणे जोडले गेले. म्हणूनच शिंग्रुबाला आधुनिक देव मानले जाते. परंतु निर्दयी धोकेबाज ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रस्ता तयार झाल्यावर शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले. ज्या जागेवर शिंग्रुबाला ठार मारले, त्या जागेवर, घाटात, शिंग्रुबाचे स्मरणार्थ एक छोटुकले देऊळ बांधले गेले. प्रत्येक ड्रायव्हर, प्रवासी आपले वाहन क्षणभर थांबवून, शिंग्रुबाला वंदन करूनच, पुढे जातो. आजही ही प्रथा पाळली जाते. जर्मन संशोधक प्रो. सोन्थायमर यांनी मराठी भाषेत धनगरांच्या मौखिक वाङ्मयाचे "छापील' ग्रंथसंग्रहात जतन करण्याचे महान कार्य केले आहे. प्रोफेसर गुन्थर सोन्थायमर पुण्यात आले. मराठी शिकले 1966 ते 1991 या काळात धनगरांच्या चालीरीती, संस्कृती, ओव्या, इतिहास, पशुपाल
पद्धत यावर जागतिक कीर्तीचे संशोधन केले.
ओव्यांचे "ध्वनिमुद्रण'
1968
मध्ये त्यांनी केलेले ध्वनिमुद्रण बिरोबांची बायको कामाबाई आणि बिरोबांच्या भावाची म्हणजे विठोबाची बायको पदूबाई यांच्या कथेवर आधारित होते. नारायण धोंडिबा माने (राहणार कुंडल, ता. तासगाव, जि. सांगली) या "निरक्षर' धनगराने सदर ओव्या म्हटल्या होत्या. माने एक उत्तम गायक होते. आपल्या खास शैलीत या ओव्या म्हणायचे कथा सांगायचे. त्या काळी माने तुफान लोकप्रिय गायक-कथाकार होते. प्रो. सोन्थायमर जेव्हा लंडनमध्ये शिकत होते, तेव्हा आष्ट्याचे बॅरिस्टर पाटील त्यांचे वर्गमित्र होते. या बॅरिस्टरसाहेबांनी आग्रह केल्यामुळे माने यांनी प्रो. सोन्थायमर यांना सहकार्य केले, हे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते. त्यानंतर 1970 मध्ये निंबवडे गावात (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे रात्री शेतात मेंढ्या बसवून आणखी एक ध्वनिमुद्रण करण्यात आले. रामदास आतकर आणि सूर्यकांत शेलार (साताऱ्याचे) या दोघांनी ओव्या म्हटल्या. लागोपाठ चार रात्री हे ध्वनिमुद्रण अखंड चालू होते. ज्या इतर चौघांनी साथ दिली, त्या धनगरांची नावे अशी आहेत 1) शंकर, 2) पांडुरंग, 3) मारुती, 4) हैबती. या ओव्या "बिरोबांच्या' आहेत - त्यानंतर बऱ्याच वर्षांनी, म्हणजे 1987 मध्ये राजाराम झगडे (राहणार काळेपडळ, हडपसर, पुणे) यांनी चार गायकांच्या साथीने, ढोल झांजांच्या तालावर सुरात ओव्या गायल्या त्याचेही रेकॉर्डिंग प्रा. सोन्थायमर यांनी स्वतः केले. यात विठोबा पदूबाईची मुलगी भागुलेक हिला विठ्ठल-बिराप्पांचा सेवक सोमा म्हालदार. तिच्या आईच्या मृत्यूची बातमी सांगता भागुबाईला माहेरी कसा घेऊन येतो, त्याचे वर्णन आहे. हे वर्णन वाचताना ऐकताना डोळ्यांत पाणी येते. या रेकॉर्डिंगच्या वेळी चार मुख्य गायक होते. हे सर्व जण बार्शी, सोलापूर येथील धनगर होते. त्यांची नावे 1) ज्ञानू भानू धनगर (मानेगावचे), 2) प्रल्हाद दगडू भिसे आणि 3) सिद्राम दादा कऱ्हे (दोघेही माळवंडीचे), 4) पांडुरंग ढेकणे (धामणगावचे). धनगरांचा दुसरा देव म्हणजे धुळोबांच्या ओव्या 1972 ला रेकॉर्ड केल्या गेल्या. एका "अंध' (नेत्रहीन) धनगराने म्हणजे दाजी रामा पोकळे (राहणार तारगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी या ओव्या आपल्या ऐटबाज बहारदार आवाजात पद्धतीत खास शैलीत सादर केल्या होत्या. सखाराम बाबू लकडे हे त्या वेळी धनगरांच्या "तोंडी' गायलेल्या ओव्यांचे संस्कृतीचे जाणकार होते. त्यांनी प्रा. सोन्थायमर यांना बरीच माहिती पुरविली.
शिंग्रुबांच्या ओव्यांचे ध्वनिमुद्रण 1987 मध्ये झाले. राजाराम झगडे, प्रल्हाद भिसे सहकाऱ्यांनी या ओव्या गायल्या कथा सांगितली. धनगरांचे मौखिक वाङ्मय ग्रंथरूपात खालील ठिकाणी उपलब्ध आहे- 1) अर्काइव्ह् रिसर्च सेंटर, दिल्ली. 2) हायडेलबर्ग युनिव्हर्सिटी, जर्मनी. 3) ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका. 4) होळकर महासंघ, नवी दिल्ली. 5) अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज, गुरगॉंव. 6) अहल्यादेवी होळकर विश्वविद्यालय, इन्दौर. प्रत्यक्ष या ओव्या कशा आहेत, याची कल्पना येण्यासाठी "शिंग्रुबा'च्या ओवीतील काही निवडक भाग.
"शिंग्रुबाची ओवी'
इठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं।
खेलु महादबुवाचं चांगभलं।।
सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं (दोन वेळा म्हणणे)
सुंबरान मांडलं गं, सुंबरान मांडलं गं।
(
सुंबरान याचा अर्थ स्मरण, इथे अर्थ शिंग्रुबा-देवाचे स्मरण)
सुंबरान मांडिलं, सुंबरान मांडिलं
पइल्या सत यौगाला आता।
खंडाळ्याच्या घाटाला खंडाळ्याच्या घाटाला। गोरा मंग सायेब
शिंग्रुबा हे नावाचा। रहात व्हता धनगर
खंडाळ्याच्या घाटाला। शेळ्या-मेंड्या राकाइला
आन गोरा मंग सायेब। रस्ता लागलं धुंडाइला
गोरा मंग सायेब। रस्ता लागलं धुंडाइला
खंडाळ्याच्या घाटाला। रस्ता नव्हता घावत
गोरा मंग सायब। शिंग्रुबाला बोलतो
रस्ता दाव आमाला। म्होरं तवा जायाला
हर हर म्हादेवाऽऽ हर हर शंकरा
आता ऐका! गोऱ्या साहेबाला शिंग्रुबा धनगराने रस्ता दाखविल्यावर काय बक्षीस गोऱ्या सायबानं शिंग्रुबाला दिलं त्याची कथा! (निर्दयी ब्रिटिशांनी शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार केलं.) गोऱ्या मंग सायबानं हो। बंदुकीला गोळी या आन्गोळी त्यानं भरले। शिंग्रुबाला मारले गोळी त्यानं भरलं। शिंग्रुबाला मारलं
गोळियांचा आवाज गं। मेंड्यांच्या ये कानाला
आन्गोळी मग आइकून। शिंग्रुबाच्या भवतनं
गोळी मग आइकून। शिंग्रुबाच्या भवतनं
शेळ्या बगा मेंड्या या। शिंग्रुबाच्या भवतनं
आन्गोळा बगा वव्हून। वर्डायाला लागल्या
आन्नाराळाचं फळ या। फळ बगा देऊन
आन्खंडाळ्याच्या या घाटाला। गाडी उबा या राहिलं
नाराळाचं फळ याऽऽ फळ बगा देऊन
गाडी गेली निगूनऽऽ पुण्याच्या हे जाग्याला
हर हर महादेवाऽऽ हर हर ये शंकरा
सुंबरान मांडिलंऽऽ सुंबरान मांडिलं.
02:10


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans