#हिंदवी_स्वराज्याचे_भीष्म_पितामह :- #पराक्रमी_सुभेदार_श्रीमंत_मल्हारराव_होळकर

१६ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा भगवा ध्वज अटकेपार दिमाखात फडकवणार्‍या माळवा प्रांताचे पहिले सुभेदार आणि होळकर सत्तेचे संस्थापक सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जयंती.
इ.स.१६९३ साली आजच्या दिवशी होळ गावचे पराक्रमी चौगुला खंडूजी होळकर आणि उत्तर महाराष्ट्र, राजस्थानात आपल्या तलवारीचे शौर्य दाखवणारे जहागीरदार शिवजी बारगळ यांची कन्या जिऊबाई यांच्या पोटी निरा नदीच्या थडी असलेल्या सातारा जिल्ह्यातील होळ गावी तिथीप्रमाणे रामनवमीच्या दिवशी सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा जन्म झाला.
सुभेदार मल्हारराव होळकरांचे वयाच्या तिसर्‍या वर्षी पितृछत्र तर दहाव्या वर्षी मातृछत्र हरवले. त्यांचे बालपण तळोदे जि.नंदूरबार येथील मामा जहागिरदार भोजराज बारगळ यांच्या भुईकोट किल्ले वजा सातमजली असलेल्या टोलेजंग गढीत गेले.
सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या शौर्याच्या कारकिर्दीची सुरूवात झाली, ती इ.स. १७१८ मधील दिल्ली मोहिमेतील एका सनसनाटी प्रसंगानेच.
स्वराज्याकडून प्रथम सामान्य मावळा म्हणून लढणार्‍या मल्हरराव होळकर यांची पहिले बाजीराव पेशवे यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. या शाब्दिक चकमकीच्या परिणामाची तमा न बाळगता, मृत्यूला न घाबरता आपल्यावर बाजीरावाकडून अन्याय झाला आहे, असे समजून बाजीरावास मल्हारराव होळकरांनी ढेकुळ फेकुन मारले.
परंतू पुढे कुठलाही अनर्थ न घडता उभयंतामध्ये दिलजमाई झाली. प्रसंगी जीवावर उदार होऊन मृत्यूला न घाबरणार्‍या या योद्ध्याने स्वराज्यविस्तारासाठी व मराठी दौलतीच्या रक्षणासाठी सातार्‍याचे छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्या नंतर सिंहासनावर असलेले रामराजे यांच्या कारकिर्दीत बाळाजी विश्वनाथ पेशव्यापासून पुढे पहिला बाजीराव पेशवा, नानासाहेब पेशवा, माधवराव पेशवा यांचे साथीने अतुलनीय शौर्य गाजवले. परंतू अटक व पानिपत इथपर्यंतच महाराष्ट्राला मर्यादीत ओळख झालेल्या सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी गनिमीकावा युध्दपध्दतीने तलवारीच्या जोरावर गाजवलेल्या काही ठळक लढाया इतिहासप्रेमीसाठी.
मध्यप्रदेशातील मांडवगडावर माळव्याचा मुघल सुभेदार दयाबहाद्दुर वास्तव्यास होता. त्याच्या पदरी असलेल्या दोन लाख सैन्याचा आपल्या जवळ असलेल्या फक्त वीस हजार फौजेच्या मदतीने सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकरांनी ‘धार’ नजीक असलेल्या ‘तिरला’ याठिकाणी मार्च १७२८ मध्ये धुव्वा उडवला. हत्तीवर बसलेल्या दयाबहादुराचे स्वतः मुंडके उडवले व मांडवगड किल्ला मराठा साम्राज्यात विलीन केला. या लढाईत उदाजी पवार सोबतीला होते.
इ.स.१७२९ मध्ये बाजीराव पेशव्याच्या नेतृत्वाखाली बुंदेलखंडातील जैतपुरच्या किल्ल्यावर छत्रसाल राजाला मदत म्हणून मुघलांच्या अलहाबादचा सुभेदार महमंद बंगश यांच्याविरुध्द झालेल्या लढाईत श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी असामान्य शौर्य दाखवले. म्हणून मल्हाररावांना ‘हंसराज’ नावाचा हत्ती बक्षीस देवून सन्मानित केले.
औरंगजेबाच्या काळापासून मुघलांच्या दरबारात वजनदार उमराव म्हणून जयपुरच्या सवाई जयसिंग रजपुत राजा वावरत होता. त्या जयसिंग रजपूत राजास गनिमीकावा पद्धतीने मंदसोर येथे सुभेदार मल्हाररावांनी इ.स. १७३३ मध्ये पराभूत केले. तेव्हा निरुपायास्तव माळव्यातील २८ परगण्यातील घेतलेल्या खंडण्या व शिवाय सहा लाख रोख मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यास देण्याचे जयसिंगराजानेे कबुल केले. यामुळे ऑगस्ट १७३३ मध्ये होळकर व शिंदे यांना वस्त्रे देऊन शाहुने बहुमान केला.
राजस्थानातील बुंदी राज्याच्या राणाीने श्रीमंत मल्हारराव होळकरास राखी बांधून भाऊ मानिले. व आपले गमावलेले बुंदी राज्य परत मिळवून देण्याची मदत सुभेदारांना मागितली.
२२ एप्रिल सन १७३४ रोजी सुर्यग्रहण असलेल्या अमावस्या दिवशी सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकरांनी बुंदी किल्ला जिंकला व राणीस तो किल्ला सुपूर्द केला.
सन १७३७ मध्ये सुभेदार मल्हारराव होळकरांनी उत्तर भारतातील शिकोहाबाद, फिरोजाबाद, इतिमादापूर ही मोगलांची ठाणी लुटून साफ केली. सोबतीला पिलाजी जाधव व सुभेदारांचे आप्तेष्ट विठोजी बुळे होते. यानंतर ९ एप्रिल १७३७ मध्ये प्रत्यक्ष दिल्लीवर प्रमुख मराठा योध्दा म्हणून सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकरांनी अभूतपुर्व लढा दिला.
सप्टेंबर १७३७ मध्ये दिल्लीचा वजीर निजामुल्मुक याच्याबरोबर भोपाळ येथे घनघोर लढाई झाली. या लढाईत मदतीसाठी आलेल्या शाहजापुरचा अमील मीरमानीखान यास स्वतः सुभेदार मल्हारराव होळकरांनी ठार केले.
जानेवारी १७३९ मध्ये साष्टी, ठाणे, तारापूर इ.ठिकाणी पायाला भलेमोठी जखम(करट) असूनही सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी अतुलनीय पराक्रम केला. ठाणे मोहिमेत मल्हारराव होळकरांनी स्वतः ‘पेड्रो डि मेलो’ या फिरंगी सेनापतीस ठार केले.
४ मे १७३९ ला वसई किल्ल्याचा निम्मा बुरूज सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या ‘मातबर’ सुरूंगामुळे ढासळला त्याच खिंडारात फिरंंग्याने तहाचे पांढरे निशान उभे केले.
मे १७३९ मध्ये हिंदूस्थानच्या वैभवाचे प्रतिक सुप्रसिध्द मयुर सिंहासन व कोहिनुर हिरा तसेच अगणित संपत्ती इराणचा बादशहा नादिरशहा इराणला घेऊन चालला होता. त्यांचा पाठलाग म्हणून १२ मे ते २२ मे १७३९ या केवळ १० दिवसात वसई ते बर्‍हाणपुर असा लांबचा प्रवास मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे या उभयंता योध्द्याने केला. मात्र दरम्यानच्या काळात बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू झाला. यामुळे मयुर सिंहासन व कोहिनुर हिरा परत आणण्याची मसलत पुढे तडीस गेली नाही.
५ जानेवारी १७४१ रोजी सुभेदार मल्हाररावाने मोगलांचे धार हे महत्वाचे ठाणे जिंकून घेतले. नंतर मे १७४३ मध्ये सभासिंग बुंदेला याच्या ताब्यात असलेल्या बुंदेलखंडातील जैतपुरचा सुप्रसिध्द व मजबुत किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांनी काबीज केल्याबद्दल महाराष्ट्रात मोठी खुशाली होऊन मराठ्यांचा दरारा चहुकडे वाढला.
१ ऑगस्ट१७४५ ते डिसेंबर 1₹१७४७ पर्यंत या दरम्यानच्या काळात सुभेदार मल्हारराव होळकर यांनी तमाम बुंदेलखंड दातिया, ओर्च्छा, भदावर, कछवा या ठिकाणी पुनः प्रतिस्पर्धी रजपूत आणि बुंदेले यांना पराजित करुन मराठ्यांचा अंमल कायम राखला.
मे १७४७ मध्ये राजस्थानातील जयपुरच्या गादीचा वारसाहक्क वाद उद्भवला होता. यात सुभेदार मल्हारराव होळकर यांनी रजपूत राजा ईश्वरसिंहचा पक्ष घेऊन रजपूत राजा जगतसिंग व माधोसिंगास राजस्थानातील पुष्कर येथे पराभूत केले. या लढाईत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मनगटास गोळी लागली होती.
१८ ऑक्टोंबर १७४८ रोजी पुन्हा बुंदी राज्याचा तंटा उद्भवला म्हणून या दिवशी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी दलेलसिंह या रजपूत राजास बाग्रु येथे पराभूत करुन १९ वर्षे निर्वासित झालेल्या उम्मेदसिंह या रजपूत राजाला बुंदीची गादी मिळवून दिली.
म्हणूनच राजस्थानी इतिहासात ‘राज्य संस्थापक मल्हारराव’ अशा गौरवपूर्ण विशेषणाने सुभेदार मल्हारराव होळकर यांना गौरविले आहे.
१९ नोव्हेंबर १७५० ला मल्हारराव होळकर आणि दिवाण गंगाधर तात्या यांनी मुकूंदरा खिंडीजवळ आणि पुढे २८ नोव्हेंबर १७५० ला नेनवे या ठाण्याला वेढा घालून काबीज केले.
१३ डिसेंबर १७५२ रोजी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी यावेळी मात्र जयपुरचा रजपूत राजा ईश्वरसिंग याच्याविरोधात जयपुर स्वारी केली. मल्हारराव होळकर यांच्या स्वारीच्या भीतीनेच राजा ईश्वरसिंग याने आत्महत्या केली. यानंतर शत्रुत्व विसरुन मल्हाररावांनी या राजाच्या मृतदेहास अग्नीसंस्कार देण्याचे कार्य स्वतः पुढाकार घेऊन केले.
२८ एप्रिल १८५१ रोजी उत्तर भारतातील फत्तेगड या किल्ल्यास वेढा देऊन पठाणाचे बहादुरखान व दहा हजार रोहिले सुभेदार मल्हारराव होळकरांनी कापून काढले. यावेळी मृत्यू पावलेले राणोजी शिंदे यांचे पुत्र जय्याप्पा शिंदे सुभेदार मल्हारराव होळकरांबरोबर होते.
जुलै-ऑगस्ट १७५२ ला दिल्लीहून देशी येतांना मल्हारराव होळकर यांनी मोगलांकडील किल्ले मार्कंडा, इंद्राई, चांदवड व घोलप कान्हेरा, राजदेहेर व काळदेहेर याप्रमाणे सात किल्ले घेतले.
१५ मार्च १७५४ या दिवशी सुरजमल जाटाच्या कुंभेरी किल्ल्याला वेढा दिला. या लढाईत एकुलता एक पुत्र खंडेराव होळकर यांचा मृत्यू झला. यामुळे सुभेदारांनी प्रतिज्ञा केली की, सुरजमल जाट यांचे शिरछेद करीन व कुंभेरीची माती यमुनेत टाकीन तरच जन्मास आल्याचे सार्थक नाही तर प्राणत्याग करीन म्हणोन दाताने ओठ चावून दुराग्रहास प्रवर्तला.’ दुर्देवाने अंतर्गत राजकीय घडामोडीमुळे सुभेदारांची शपथ पुर्ण झाली नाही.
२६ मे १७५४ या दिवशी दिल्लीच्या बादशहावर सिंकदराबाद येथे छापा घातला. बादशहाची आई मलका-ए-जमानीस पेंढारी लुटत असतांना सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्याच पेंढारी सैनिकास ठार केले. या कृतीतून परस्त्री सन्मान करणे हा शिवाजी महाराजांचा वारसा सुभेदारांनी पुढे चालवला.
२० ऑक्टोंबर १७५५ ला दक्षिणेतील सावरनूर किल्ला हस्तगत करतांना सुभेदार मल्हारराव होळकरांबरोबर विठ्ठलराव विंचुरकरांनी पराक्रम केला. या लढाईचे फलित म्हणजे स्वराज्याचे पुर्वीचे विख्यात सेनापती संताजी घोरपडे यांचे नातू मुरारराव घोरपडे सावनूरच्या नवाबांकडून लढत होते. मल्हारराव होळकर यांच्या शब्दाखातर ते स्वराज्यात सामील झाले.
इ.स.१७५८ साली सुभेदार मल्हारराव होळकर यांनी पेशवा कुटूंबातील रघुनाथराव समवेत दिल्ली जिंकून घेतली.त्यानंतर अब्दालीच्या अधिकार्‍यास पिटाळून लावून पंजाब जिंकला. अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मल्हारराव होळकर व रघुनाथराव अटकेपर्यंत गेले. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. सुभेदार मल्हारराव होळकर व रघुनाथराव यांनी लाहोर, पेशावर, अटक इथपर्यंत मोहिम यशस्वी केली. दिल्ली ते अटकेपर्यंतच्या जिंकलेल्या भागावर आपले स्वकीय तुकोजी होळकरांची नेमणुक मल्हाररावांनी केली. यावेळी सुभेदार मल्हारराव होळकरांचे वय ६५ वर्षे होते, हे विशेष...
‘रघुनराथराव पेशवा उत्तरेतील परिस्थितीस वाकब व स्वतःचे निश्चयाने वागणारा नव्हता. अशी नोंद रियासतकारांनी करुन ठेवलेली आहे. तसेच जिंकलेल्या भागावर तुकोजी होळकरांची नेमणुक करणे, यावरुन अटकेपार मोहिमेचे यशाचे ‘संपूर्ण श्रेय सुभेदार मल्हारराव होळकरांकडे जाते’, हे स्पष्ट होते.
वयाची ६८ वर्षे पुर्ण होऊनही तसेच पानिपत (१७६१) मध्ये पराभव झाल्यानंतर सुध्दा रजपुता राजा माधोसिंगाविरुध्द मंगरोळ भटवाडाची लढाई (२९ नोव्हेंबर १७६१), निजामाविरुध्द राक्षसभुवनाची लढाई ( ऑगस्ट १७६३), इंग्रजाविरुध्द काल्पीची लढाई (१७६६) इ.लढाया यशस्वीपणे मारल्या.
कित्येक महापराक्रमी महापुरूष बदनामी लिखानातून सुटले नाही तसे सुभेदार श्रीमंत मल्हाररराव होळकर देखील सुटले नाही. पानिपत संग्रामात त्यांच्याकडून कुचराई झाली असे, काही इतिहासकारांनी अंत्यत चुकीचे लेखन केले.
सुभेदाराशिवाय महादजी शिंदे, साबाजी शिंदे, जानराव, विठ्ठल शिवदेव, अंताजी माणकेश्वर, दमाजी गायकवाड, नाना पुरंदरे, विंचुरकर, गंगोबा चंद्रचुड इ.मराठा सरदार पानिपतमधून माघारी परतले, असे इतिहासकारांनी नमुद केले आहे. मात्र यांच्या तुुलनेत थोडे जास्तीचे लेखन सुभेदार मल्हारराव होळकरांवर केले.
मात्र वयाच्या ६८ व्या वर्षी पानिपतमध्ये सायंकाळपर्यंत रणागणांत सुभेदार मल्हारराव होळकर व शिंदे लढत होते. असे उत्तर भारतातील इतिहासात उल्लेख सापडतो. 1863 साली मल्हारी अत्रे यांच्याकडून सुभेदारांवर लिहून पुर्ण झालेले चरित्र ‘थोरले सुभेदार मल्हारराव होळकर’, अलीकडे गोपाळरराव देशमुख लिखित ‘सुभेदार मल्हारराव होळकर एक राष्ट्रपुरूष’ या पुस्तकात सुध्दा हा उल्लेख पुराव्यानिशी सापडतो.
तसेच पानिपतकालीन व काही प्रत्यक्षदर्शी इतिहासकारापैकी ‘तारीखे फैजबक्ष’ या ग्रंथातून रामपुरच्या रोहिला पदरी असलेला शिवप्रसाद, ‘काशीराजाची बखर’ या ग्रंथातून अयोध्याच्या शुजाउद्दोल्याचा कारभारी काशीराज, उर्दु कवीश्रेष्ठ मीरतकी मीर याने आपल्या आत्मचरित्रातून, ‘निगार नामाये हिंद’ या ग्रंथातून गुलामअली इत्यादी इतिहासकारांनी ‘मल्हारराव होळकर हे अनुभवी आणि पोक्त बुध्दीचे होते, त्यांच्या सल्याप्रमाणे भाऊ व विश्वासराव वागले असते तर एवढी महाभयंकर आपत्ती ओढवली नसती’, असे नमुद केले आहे.
याशिवाय नानासाहेब पेशव्यानीं पानिपत युध्दानंतर सर्व हिंदूस्थानचा मराठा सत्तेकडून राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार ‘#हिंदुस्थानची_येखतियारी’ या नावाने सुभेदार श्रीमंत मल्हाररावाकडे दिला. मराठा सत्तेची पानिपतानंतर उत्तर हिंदूस्थानातील विस्कटलेली घडी मल्हाररावांनी शेवटच्या श्वासापर्यंत सावरुन हा निर्णय सार्थ ठरवला. यावरुन मराठा साम्राज्य विस्तारासाठी मोलाची कामगिरी पार पाडणार्‍या सुभेदार मल्हारराव होळकरांवरती पाणिपत अपयशाचा डाग लावण्याचा काही जणांनी केविलवाणा प्रयत्न केला, असे स्पष्ट होते.
अशा या हिंदूस्थानातील सर्वात जास्त रणात आयुष्य घालवणार्‍या तेजस्वी योध्दयाचा मृत्यू सुप्रसिध्द झाशी किल्ल्याला वेढा दिला असताना वार्धक्यात सुध्दा रणात सततची धावपळ झाल्याने 20 मे 1766 साली झाला.
लेखक :- नजन लक्ष्मण श्रीपती, पाटोदा. जिल्हा बीड.
8275386742


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans