*होळकर घराण्याची पुर्वपिठिका*


छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य नर्मदेपार आसेतूहिमाचल पोहचवण्यात जी काही सरदार घराणी होती त्यामध्ये होळकर घराण्याच नाव अगदी वरच्या क्रमांकामध्ये घ्यावे लागेल. छ राजाराम महाराजांच्या प्रेरणेने मराठ्यांची घोडी नर्मदेपार जाऊ लागली. नर्मदापार जाणारे मराठा वीर नेमाजी शिंदे त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेऊन थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या सोबतीने मल्हारराव होळकर उत्तर भारत पालथा घालू लागले . स्वकर्तुत्वाने मल्हारराव होळकर माळवा प्रांतातील इंदौर नगरीचे संस्थापक बनले. पुढे अहिल्यादेवी होळकर व महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कार्यकाळात या घराण्याने राजवैभव मिळवले. परंतु या घराण्याची पुर्वपिठिका खूपच कमी प्रमाणात उजेडात आली आहे. त्या साठीच हा थोडासा प्रयत्न .
होळकर घराण्याच्या मूळपुरुषाचे नाव मळीबा अथवा मळीगावडा व मूळ आडनाव वीरकर असून मळीबा पासून सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यापर्यंत 14 पिढ्या होतात. हे घराणे तत्कालीन परिस्थिती , व्यवसायानुसार वीर , होळ, वाफगाव , मांडवगण / कात्राबाद इत्यादी वेगवेगळ्या गावामध्ये काळाच्या ओघात स्थायिक व स्थलांतरित झाले. या घराण्यातील *हरजी* या व्यक्तीपासून होळकर हे आडनाव लागू झाले असे दिसते. ह्याच व्यक्तीच्या काळात या घराण्याचे वास्तव्य हे होळ गावी असावे असे होळकर राजघराण्याच्या वंशावळी वरून दिसून येते.
सुभेदार मल्हारराव होळकर यांचे आजोबा हिंगोजी / हेगोजीबाबा हे सुपे बारामती परगण्याचा देशगावडा वतनदार होते. या वतना मध्ये समाविष्ट असलेल्या गावांची संख्या 63 इतकी होती. देशगावडा हा देशमुख देशपांडे या वतनदाराप्रमाणे काही परगण्यात वंशपरंपरागत चालत आलेला मिरासदार होय. देशमुख देशपांडा हे ज्या प्रमाणे परगण्यातील सर्व कृषकांचे मुख्य प्रतिनिधी म्हणून काम पाहत असत अगदी त्याचप्रमाणे देशगावडा हा परगण्यातील सर्व गवळ्यांचा धनगरांचा मुख्यप्रतिनिधी म्हणून काम पाही. गौड अथवा गावडा हे या पदांचा उगम देशमुखीच्याही फार पूर्वी झालेला असल्याने देशगावडा हे वतन देशमुखी वतनापेक्षा अधिक पुरातन असावे . गावडा या शब्दाचा अर्थ गावगाडा वसवनारा ह्या अर्थाने घेतला गेला असून देशगावडा म्हंजे परगण्याचे पालकत्व घेत काळजी घेणारा अधिकारी असा ही करता येऊ शकेल. अश्या या देशगावडा वतनाखेरीज होळकर घराण्याकडे वाफगाव , मांडवगण /कात्राबाद , इत्यादी गावांची पाटिलकिची वतने ही होती. तर मल्हारराव होळकर यांचे वडील खंडोजी होळकर हे देखील देशगावडा या नात्याने काम पहात होते मात्र संभाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर मोघलानी केलेल्या धामधुमीत खंडोजी होळकर परागंदा झाले असावेत.
होळकर घराण्याचा भोसले घराण्याशी देखील काही प्रमाणात सबंध असल्याचे तंजावरच्या बृहिदेश्वर मंदिरावरील शिलालेखा वरून दिसून येते. शहाजी राजेच्या दिमतीला असणाऱ्या सरदारा मध्ये होळकर सरदारांचा उल्लेख येतो. हे होळकर मल्हारराव होळकर यांचे पूर्वज असण्याची शक्यता आहे कारण शहाजीराजे भोसले यांचे मोकासा वतन हे सुपे बारामती परगणा होता तर त्याच परगण्याचे देशगावडा होळकर होते. त्यामुळे हि शक्यता नाकारता येणार नाही. पुढे याच बारामती सुपे परगण्यातील लढवय्या सरदारांना एकत्रित आणून सुभेदार मल्हारराव होळकरानीं 25000 सैन्य उभे केले या मध्ये देवकाते , गासे , आबोले , पाडसे , हटकर , खुंटे , करदेवकर , अश्या सरदारांना एकत्रित आणून होळकरांच्या साम्राज्याची मेढ रोवीली.
अश्या पध्दतीने मल्हारराव होळकर यांच्या पूर्वीच्या पिढ्या देखील सक्रिय राजकारणात सहभागी असून सुपे बारामती सारखा स्वराज्याच्या एक महत्वपूर्ण अंग असणाऱ्या परगण्यात एक जबाबदारीचे वतन सांभाळत असल्याचे स्पष्ट होते.
अश्या या होळकर घराण्यातील कर्तुत्वान , महापराक्रमी , राजनीतिधुरंधर , चाणाक्ष मुत्सद्दी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा आज जन्मदिन.
*पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा*
संदर्भ :
सरंजामी मरहट्टे लेखक संतोष पिंगळे
केतकर ज्ञानकोश ( देशगावडकी च्या वतना संदर्भात )
मराठा साम्राज्याची बखर
मधुकर हक्के

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans