माने राजघराणे (कुंतलचे राष्ट्रकूट )
नहपानाचे काही वंशज दक्षिण भारतात गेले. त्यांपैकी मान राजाचे नाव पुराणात येते. त्याची क्षहरातांची(खरात) विशिष्ट चिन्हे असलेली नाणी माहिषक प्रदेशात (आंध्र प्रदेश) सापडली आहेत. पुढे कर्नाटकात शकसत्तेचा विस्तार होऊन त्यायोगे शक संवताचा दक्षिणेत प्रसार झाला, असे दिसते.
सर्वांत प्राचीन ज्ञात राष्ट्रकूट घराणे कुंतल देशात कृष्णानदीच्या खोऱ्यात राज्य करीत होते. त्याचा मूळ पुरुष मानांक (सु. कार. ३५०–७५) हा होय. याने आपल्या नावे मानपूर नामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली. हे मानपूर सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्याचे माण असावे. ह्या राष्ट्रकूट नृपतींना कुंतलेश्वर म्हणत.
मानांकचा पुत्र देवराज याच्या काळी गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त (विक्रमादित्य) याने आपला राजकवी कालिदास याला या कुंतलेश राष्ट्रकूटांच्या दरबारी वकील म्हणून पाठविले होते. या प्रसंगाने कालिदासाने कुंतलेश्वरदौत्य रचले होते. ते आता उपलब्ध नाही; पण त्यातील काही उतारे राजशेखर व भोज यांच्या अलंकार ग्रंथांत आले आहेत.
Comments
Post a Comment