धर्मेतिहासातलं अज्ञात (डॉ. सदानंद मोरे)


पश्चिम आशियातल्या इतिहासाच्या व विशेषतः धर्मेतिहासाच्या ‘मॉडेल’वर भारताचा इतिहास व विशेषतः धर्मेतिहास बेतावा का, असा प्रश्नर उपस्थित केला तर तो बऱ्याच जणांना आवडणार नाही; परंतु धर्माच्या इतिहासाच्या संदर्भात काही साम्यस्थळं निश्चिपतच आढळतात.
पश्चिम आशियातला सर्वात प्राचीन धर्म म्हणजे अर्थातच यहुद्यांचा, ज्यू लोकांचा. ‘जुना करार’ हा या धर्माचा धर्मग्रंथ असून, त्याचं तत्त्वज्ञान प्रेषितांनी प्रकट केलेल्या दैवी संदेशांवर आधारित आहे. याच धर्मातून येशू ख्रिस्तांचा ख्रिश्च्न धर्म उदयास आला. मात्र, स्वतः येशूंची भूमिका ‘आपण प्राचीन यहुदी धर्माच्या विरोधात बंड करत आहोत; आपण जुन्याचा विनाश करणार आहोत, अशी नसून जुन्यात भर टाकून त्याची पूर्णता करायला आलेलो आहोत,’ अशी होती. मात्र, अर्थातच त्यांचा हा दावा पारंपरिक यहुदी मान्य करणं शक्ये नव्हतं. त्यांनी येशूंना पाखंडी वा धर्मद्रोही ठरवलं. रोमन राज्यकर्त्यांकडं तक्रार वगैरे करून त्यांना संपवलं.
ख्रिस्ती लोकांच्या ‘बायबल’ या धर्मग्रंथाला ‘नवा करार’ असं म्हणतात. या नावावरूनच त्याचं यहुद्यांच्या पारंपरिक धर्माशी असलेलं नातं स्पष्ट होतं.



देशी- विदेशी साहित्यिक, समाजधुरीण, नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ- संशोधक आदींच्या आयुष्यातल्या, तसंच विविध साहित्यकृतींविषयीच्या अनेक बाबी सर्वसामान्यांना ‘अज्ञात’च असतात. माहीत नसलेले हे पैलू जाणून घेण्याची उत्सुकता, जिज्ञासा साहित्यरसिकाला असते. आजवर पुढं न आलेल्या बाजू ‘अज्ञात पैलू थोरांचे’ या सदरातून वाचकांच्या पुनर्भेटीला येत आहेत, दर आठवड्याला. 

पश्‍चिम आशियातल्या इतिहासाच्या व विशेषतः धर्मेतिहासाच्या ‘मॉडेल’वर भारताचा इतिहास व विशेषतः धर्मेतिहास बेतावा का, असा प्रश्‍न उपस्थित केला तर तो बऱ्याच जणांना आवडणार नाही; परंतु धर्माच्या इतिहासाच्या संदर्भात काही साम्यस्थळं निश्‍चितच आढळतात.

पश्‍चिम आशियातला सर्वात प्राचीन धर्म म्हणजे अर्थातच यहुद्यांचा, ज्यू लोकांचा. ‘जुना करार’ हा या धर्माचा धर्मग्रंथ असून, त्याचं तत्त्वज्ञान प्रेषितांनी प्रकट केलेल्या दैवी संदेशांवर आधारित आहे. याच धर्मातून येशू ख्रिस्तांचा ख्रिश्‍चन धर्म उदयास आला. मात्र, स्वतः येशूंची भूमिका ‘आपण प्राचीन यहुदी धर्माच्या विरोधात बंड करत आहोत; आपण जुन्याचा विनाश करणार आहोत, अशी नसून जुन्यात भर टाकून त्याची पूर्णता करायला आलेलो आहोत,’ अशी होती. मात्र, अर्थातच त्यांचा हा दावा पारंपरिक यहुदी मान्य करणं शक्‍य नव्हतं. त्यांनी येशूंना पाखंडी वा धर्मद्रोही ठरवलं. रोमन राज्यकर्त्यांकडं तक्रार वगैरे करून त्यांना संपवलं.

ख्रिस्ती लोकांच्या ‘बायबल’ या धर्मग्रंथाला ‘नवा करार’ असं म्हणतात. या नावावरूनच त्याचं यहुद्यांच्या पारंपरिक धर्माशी असलेलं नातं स्पष्ट होतं. यहुद्यांचे सर्व पूर्वप्रेषित येशूंना आणि अर्थातच त्यामुळे ख्रिस्ती धर्माला मान्य आहेत. दोन्ही धर्मांमधल्या पुराणकथा, विश्वोत्पत्ती व विश्‍वसंहारकथा, मृत्यूनंतरच्या गतीविषयक धारणा (निवाड्याचा दिवस आणि त्यानुसार स्वर्ग-नरकात पाठवणी) अशा कितीतरी बाबी त्यांना समान आहेत.
पुढं पश्‍चिम आशियात अरब जमातीमध्ये आणखी एक धर्म उदयाला आला. त्याचं नाव इस्लाम. त्याची स्थापना महंमद पैगंबरांनी केली.
मौज अशी आहे, की जे नातं ख्रिस्ती धर्माचं यहुदी धर्माशी तेच नातं इस्लामचं आपल्या अगोदरच्या ख्रिस्ती आणि यहुदी धर्माशी आहे. स्वतः महंमदांना यहुद्यांच्या सर्व प्रेषितांसह ख्रिस्ती धर्माचे येशू यांचंही प्रेषित असणं मान्य आहे. यहुदी आणि ख्रिस्ती धर्मातल्या सर्व पुराणकथा इत्यादी इस्लाममध्येही स्वीकारल्या गेल्या आहेत. फरक भाषेप्रमाणे पडतो. त्यामुळं उदाहरणार्थ ः अब्राहमचा इब्राहिम होतो, तर डेव्हिडचा दाऊद आणि ॲडमला आदम म्हटलं जातं, तर ईव्हला हव्वा.

इथं भाषेचा मुद्दा येतो. यहुद्यांची व त्यांच्या ग्रंथाची जी भाषा हिब्रू तीच स्वतः येशूंची आणि ख्रिस्ती धर्मग्रंथाची हे उघड आहे. स्वतः महंमद आणि इस्लामचा धर्मग्रंथ कुराण यांची भाषा हिब्रू नसली तरी हिब्रू भाषेच्याच जातकुळीची मानली जाते.

खरं तर भाषेचा हा मुद्दा खुद्द महंमदांच्या विचारातच येतो. ‘ईश्‍वर अत्यंत कृपाळू असून, जगातल्या सर्वच समाजांचा (कौम) उद्धार व्हावा, असं ईश्‍वराला वाटतं आणि म्हणूनच त्या त्या समाजाला त्याच्या त्याच्या भाषेत (ईश्‍वरी) संदेश पोचवील, अशा प्रेषिताला पाठवतो, असं महंमदांचं मत होतं. त्यामुळं जुन्या-नव्या कराराची आणि कुराणाची भाषा या एका भाषाकुलात मोडणाऱ्या आहेत, हा योगायोग म्हणायला हरकत नाही. ईश्‍वरानं या कुलाबाहेरच्या भाषा बोलणाऱ्या समूहांसाठीही त्यांच्या त्यांच्या भाषेतून ईश्‍वरी ज्ञान देण्यासाठी संदेष्टे (Prophet : प्रेषित) पाठवायला हरकत नसावी.

हिब्रू-अरबी या भाषांच्या कुलासाठी भाषाशास्त्रज्ञांनी ‘सेमिटिक’ या शब्दाचा उपयोग केला. पश्‍चिम आशियातल्या या सर्व लोकांच्या वंशालाच सेमिटिक म्हटलं जातं आणि यहुदी, ख्रिस्ती व इस्लामी धर्माच्या लोकांचा पूर्वज अब्राहम आहे, याबाबत या तिघांचंही मतैक्‍यच आहे. म्हणून या तीन धर्मांना ‘अब्राहमिक’ धर्म असंही म्हटलं जातं.

भाषेच्या व वंशाच्या संदर्भातला ‘सेमिटिक’ हा शब्द धर्माच्या बाबतीतही लागू होतो. यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम या तीन धर्मांना ‘सेमिटिक धर्म’ असं त्यानुसार म्हटलं जातं. या तीन (सेमिटिक) धर्मांत झालेली व अजूनही सुरूच असलेली (धर्म)युद्धं व नरसंहार गृहीत धरूनही त्यांच्यात लक्षणीय साम्य आहे, हे मान्यच करावं लागतं. अर्थात यहुदी वगळता इतर धर्मांच्या उपपंथांमध्येही असाच संघर्ष झाला व होत असल्याची कल्पना ज्यांना आहे, त्यांना धर्माधर्मांतल्या संघर्षाचं आश्‍चर्य वाटायचं कारण नाही. इंग्लंडमध्ये प्रोटेस्टंटांनी चालवलेल्या कॅथॉलिकांच्या छळाला कंटाळून इंग्लिश कॅथॉलिक फादर स्टीफन्स भारतात गोवा या प्रदेशाचा आश्रय घेतो. कारण गोव्यात तेव्हा कॅथॉलिक ख्रिस्त्यांची सत्ता होती (याच स्टीफन्सनं मराठी भाषा आत्मसात करून ‘ख्रिस्तपुराणा’ची निर्मिती केली. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापनाही झालेली नव्हती.)

प्रश्‍न हा आहे, की याप्रमाणे भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या धर्मेतिहासाचा विचार करता येणं शक्‍य आहे का? म्हणजे (वैदिक) हिंदू, जैन, बौद्ध, वारकरी, महानुभाव यांचं विवेचन या चौकटीत करावं का? ‘सेमिटिक’ या संकल्पनेला समांतर असं इथं काही आढळतं काय?
पहिला मुद्दा भाषेचा. हिंदू धर्माची संस्कृत, बौद्धांची पाली, जैनांची मागधी, वारकऱ्यांची व महानुभावांची मराठी या सर्व भाषा एकाच भाषाकुलातल्या आहेत, याबाबत संशय घ्यायचं कारण नाही. उत्तरकालीन बौद्धांनी आणि जैनांनी संस्कृत भाषेत विपुल लेखन केलं. अश्‍वघोष, बसूबंधू, धर्मकीर्ती, नागार्जुन, कुंदकुंद इत्यादी आचार्यांनी लिहिलेल्या संस्कृत ग्रंथांशिवाय आपण बौद्ध व जैन धर्मांची कल्पनाच करू शकत नाही.

वंशाच्या मुद्द्याला किती महत्त्व द्यायचं, याबद्दल मतभेद होऊ शकतात. आर्य, अनार्य, द्रवीड, नाग या शब्दांनी आपलं वंशविषयक चर्चाविश्‍व नको तेवढं समृद्ध झालेलं आहे. अलीकडच्या काळात तर मूलनिवासी वादही उफाळून आला आहे. भारत देशातलं वांशिक वैविध्य व सरमिसळ गृहीत धरूनही स्थूलमानानं असं म्हणता येतं, की ज्या वंशाचे वसिष्ठ, विश्वामित्र, याज्ञवाल्क्‍य, राम-कृष्ण, जनक, कपिल हे होते, त्याच वंशाचे महावीर, बुद्ध, चक्रधर, ज्ञानेश्‍वर, नामदेव, तुकाराम हेही होते. ‘आर्य’ शब्दाबद्दल काहींना शंका असली, तरी खुद्द महावीर व बुद्ध यांना विचारलं असतं तर त्यांनी, आपण आर्य असणं नाकारण्याची शक्‍यता फारच कमी असणार, हे उघड आहे. बुद्धांनी मांडलेल्या सिद्धान्ताला ‘आर्य सत्ये’ असं म्हटलं जातं. ‘अनार्य सत्ये’ किंवा ‘द्रवीड सत्ये’ नव्हे; हे लक्षात घ्यायला हवं. दोघांच्याही काळात आर्यांची चातुर्वर्ण्यव्यवस्था प्रचलित होती. ती मान्य की अमान्य हा प्रश्‍न उद्भवतच नव्हता. या दोन धर्मसंस्थापकांचे वैदिक व्यवस्थेशी मतभेद कुठं होते?

एकतर वैदिकांनी, या व्यवस्थेत लवचिकता मुळीच असू नये, असे प्रयत्न चालवले होते व त्यासाठी ते धर्माचा उपयोग करू लागले होते. दुसरं म्हणजे, या व्यवस्थेत ब्राह्मण सर्वांत श्रेष्ठ असल्याची त्यांची धारणा होती. जैन-बौद्धांना व्यवस्थेत व पुरेशी लवचिकता हवी होती आणि दुसरं म्हणजे व्यवस्थेत अनुस्यूत असलेली व्यवसायविषमता श्रेष्ठ-कनिष्ठतेला वाव देत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं आणि वाद-विवादाची वेळ आलीच तर ते ब्राह्मणांपेक्षा क्षत्रियच श्रेष्ठ असल्याचा दावा करत.
वैदिक, जैन आणि बौद्ध या धर्मांमध्ये व त्यांच्याच तत्त्वज्ञानांमध्ये (दर्शने) देवाण-घेवाण असे. परस्परप्रभावही टाकला जाई. त्यांच्या पुराणकथांमध्ये, अवतारांमध्येही साम्य आढळतं.

गौतम बुद्धांचा समावेश हिंदूंनी दशावतारात केला व त्यांना नवव्या अवताराचं स्थान दिलं, हे सर्वज्ञात आहे. याउलट कृष्णाला बौद्धांनी आपल्या पुराणकथांत सामावून घेतलं. त्यानुसार कृष्णावताराच्या वेळी बोधिसत्त्व (अर्थात बुद्ध) कृष्णाचा भाऊ घटपंडित होता.
जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव भागवत पुराणामधल्या २४ अवतारांत महत्त्वाचं स्थान पटकावतात. २२ वे तीर्थंकर अरिष्टनेमी ऊर्फ नेमीनाथ हे तर कृष्णाचे चुलतभाऊच. कृष्ण त्यांच्याशी स्पर्धा करी. ते वरचढ होतील, अशी त्याला नेहमी भीती वाटायची, तेव्हा युक्ती-प्रयुक्तीनं त्यांना वैराग्य प्राप्त व्हावं, असा बनावच कृष्णानं घडवून आणला. तसं घडलंसुद्धा.
 

बौद्ध आणि जैन यांच्या रामायणाच्याही स्वतंत्र कथा आहेत. जैनांचं तर स्वतंत्र पूर्ण असं हरिवंशपुराणसुद्धा आहे. इतर धर्मांमधल्या कथांचा स्वीकार करताना त्या आपल्या चौकटीत बसतील, एवढी खबरदारी ही मंडळी घेत असत. उदाहरणार्थ ः जैनांचा अहिंसेवर अतिरिक्त भर होता; त्यामुळं कथानकातून हिंसेचा घटक किमान पातळीवर आणण्याकडं त्यांचा कल असे. महाभारतात जरासंधाचा वध होतो; पण जैनांच्या पुराणात त्याची यथेच्छ धुलाई करून सोडून देण्यात येतं व तोही हवालदिल होऊन अरण्यात तपाचरणासाठी निघून जातो. कृष्णाअगोदरची देवकीची सातही अपत्यं यमसदनास पाठवण्यासाठी कंस प्रयत्नशील असतो. आठव्या अपत्याच्या, म्हणजेच कृष्णाच्या वेळी वसुदेव गोकूळात जाऊन यशोदेच्या कन्येला घेऊन येतो व कृष्णाला तिथं ठेवतो. कंस तिलाही दगडावर आपटून मारण्याचा प्रयत्न करतो; पण ती त्याच्या हातून सुटून आकाशात जाते, हा कथाभाग हिंदूंना ठाऊक असतो. जैनांच्या आवृत्तीत अदलाबदलीचा हा प्रकार एकदा नव्हे; तर आठही वेळा होतो. देवकीचं जिवंत बाळ घेऊन वसुदेव गोकूळात जाणार व नेमक्‍या त्याच वेळी यशोदेच्या पोटी जन्मतः मृत असलेलं बालक उचलून मथुरेच्या कारागृहात परतणार व देवकीचं बाल मृतावस्थेत जन्मल्याची खबर कंसाला पाठवणार, त्यामुळं कंसावर बालहत्येचं बालंट नको व हिंसाही नको.

वैदिक धर्माच्या पूर्वकाळात पूर्णतः मांसाहारी असलेले ब्राह्मण नंतर निवृत्तमांस झाले, याचं श्रेय लोकमान्य टिळकांनी जैन धर्माला देऊ केलं आहे, हे लक्षात घेतलं म्हणजे हिंदू धर्मावर जैनांचा किती प्रभाव पडला, हे दिसून येतं.

तात्पर्य, धर्मेतिहासाच्या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी अजूनही बऱ्याच जणांसाठी अज्ञातच आहेत.















Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans