हा लेख धनगर समाजातील लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. धनगरांनो पहा आपले पुर्वज काय होते. ......आणि तुम्ही काय आहात



सरदार देवकाते :
बळवंतराव देवकाते :
सरदार जिवाजी राजे देवकाते हा विजापूर दरबारातील एक मातब्बर सरदार. विजापूरच्या पातशाहाकडून वंशपरंपरेने जहागीर, मनसब, इनामे व वतने घेऊन सेवाचाकरी करत होता. पहिल्या शाहूने देवकाते यांना दिलेल्या वतनपञातील नोंदीनुसार विजापूरकरांकडून कर्यात बारामती प्रांत सुपे येथील २२ गावांची सरपाटीलकी तर ०६ गावांची पाटीलकी त्यास वंशपरंपरेने मिळाली होती. तसेच मौजे कन्हेरी हा गाव वंशपरंपरेने इनाम देण्यात आला तर मौजे सोनगाव या गावी एक चावर (६० एकर) जमिन इनाम देण्यात आली होती अशी नोंद सापडते. छञपती शिवाजी राजांनी रयतेचं राज्य उभे केल्यानंतर स्वताच्या जागीरीला व वतनाला लाथ मारत देवकाते स्वराज्यात सामील झाले. अफजलखान मोहिमेतही शिवाजी राजांकडून देवकाते लढल्याच्या नोंदी मिळतात. इ.स.१६७४ च्या शिवछञपतींच्या राज्याभिषेकाला उपस्थित असलेल्या सरदारांच्या यादीमध्ये देवकाते घराण्यातील 'भवानराव' व 'बळवंतराव' यांचा उल्लेख येतो. 'भवानराव' व 'बळवंतराव' ही केवळ नावे नसून ते किताब असल्याचं शाहू व पेशवे कालीन कागदपञांवरून सिद्ध होतं. प्रत्यक्ष शिवछञपतींने दिलेले हे किताब देवकाते सरदारांनी स्वराज्यासाठी दिलेलं महत्वपूर्ण योगदानच अधोरेखित करतात. शिवछञपतींनी बळवंतराव यांना मौजे सोनगाव या गावी सवा चावर (७५ एकर) जमिन इनाम दिली असल्याची नोंद ही या कागदपञांमध्ये सापडते. आजही या गावातील देवकाते मंडळींची निवासीवस्ती इनामपट्टा म्हणूणच ओळखली जाते.
संभाजीराजांना औरंगजेबाने ठार मारल्यानंतर स्वराज्यातील कित्येक सरदार वतनाच्या लालसेने मोघलांना मिळाले. अशा बिकट प्रसंगी संकटात सापडलेली स्वराज्यरूपी नौका पैलतीरास लावण्याचे काम सेनापतींच्या दिमतीला राहून देवकाते यांनी पार पाडले. जे सरदार स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले, अशा सरदारांना राजाराम महाराजांनी इ.स.१६९० मध्ये वतने दिली. त्यात देवकाते घराण्याचाही समावेश आहे. यात धर्मोजी बळवंतराव देवकाते यांना प्रांत कडेवळीत मधील ०८ महालांचे सरपाटील हे वतन दिले. धर्मोजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुञ सुभानजी यांना "बळवंतराव" तर मकाजी यांना "हटकरराव" असे किताब व सरंजाम देऊन त्यांचा गौरव केला. पुढे राजाराम महाराज व सेनापती संताजी घोरपडे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याने घोरपडे यांचे सेनापती पद काढून घेण्यात आले व त्यांच्या दिमतीला असलेली स्वराज्याची फौज ही काढून घेण्यात आली. ही घटना इ.स.१६९६ साली घडली तेव्हा सेनापतींच्या दिमतीला असलेले मकाजी हटकरराव आपले भाऊबंद व फौजेसह जिंजी येथे राजाराम महाराजांना जाऊन मिळाले. स्वराज्याच्या व नंतर साम्राज्याच्या अनेक महत्वपूर्ण लढायांत देवकाते सरदारांचे योगदान बहुमूल्य राहिले.
सरदार देवकाते यांचा सरंजाम:
शाहूने देवकाते यांना लष्करी खर्चासाठी एकूण १६ महाल व २१ गावे सरंजाम म्हणून दिली होती.हा सरंजाम बळवंतराव व हटकरराव यांच्यात ०३:०२ प्रमाणात विभागला गेला.पुढे दोघांच्याही सरंजामात वारसांच्या संख्येच्या प्रमाणात भाग होत गेले.बळवंतराव घराण्याच्या ०३ तकसीम (भाग) सरंजामापैकी ०२ तकसीम चव्हाजी बळवंतराव बाळगून असत तो असा;
प्रांत सुपे बारामती : ०६ गावे
प्रांत कडेवळीत : ३९ गावे
प्रांत बालेघाट : अर्धा महाल
सरकार नांदेड : ०१ महाल व ०३ गावे
सरकार पाथरी : ०१ कसबा
सरकार माहूर : ०६ महाल दीड कसबे व ०१ गाव
एकूण : साडे सात महाल अडिच कसबे व ४९ गावे.
सरंजामातील संबंधीत प्रांत,गाव व गावांवरील एकूण हक्काची सविस्तर माहितीही सरंजामपञात दिलेली असे. सरंजाम हा वंशपरंपरेने चालणारा अधिकार नसे. त्यामुळे त्या सरंजामात वारंवार बदल ही होत असत. अनेकदा सरंजाम जप्त अथवा कमी करण्यात येई. तसेच तो वेळप्रसंगी वाढविण्यातही येई. सरंजामातील काही गावे इनाम करून दिली असल्यास अशा गावांवरील संबंधित सरदारांचा अधिकार माञ वंशपरंपरेने चाले. देवकाते यांना बारामती येथील कन्हेरी,सोनगाव व निरावागज तर कडेवळीत मधील कोंढार चिंचोली,कवढणे व दिगसल अंब अशी ६ गावे शाहूने व पेशव्यांनी प्रांत गंगथडी मधील सेंदूरजने अशी ०७ गावे वंशपरंपरेने इनाम होती.
संदर्भ : शाहू व पेशवा दफ्तर पुराभिलेखागार, पुणे.
सौजन्य : श्री. संतोष पिंगळे (वेध धनगर सरदारांच्या कर्तबगारीचा आणि गौरवांचा)
https://www.facebook.com/431647620269693/photos/a.431651163602672.1073741828.431647620269693/552719941495793/?type=1&comment_id=553914128043041&notif_t=like





Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans