गीतार्थविलास (६२) प्रकरण दुसरे - अर्जुनाची समस्या (१९)
अर्जुन ही काय चीज आहे याची आपल्याला ओळख होते ती पोपटाच्या डोळ्यामुळे. त्या सर्व राजकुमारांत एकट्या अर्जुनालाच काय तो 'फक्त पोपटाचा डोळा' दिसतो. ती गोष्ट सांगून व्यासांनी अर्जुनाची ध्येयासक्ती, एकाग्रता व अचूक काम करण्याची प्रवृत्ती अशा अनेक गुणांची आपल्याला ओळख करून दिलेली आहे. धनुर्विद्येत तो अव्वल यामुळेच होऊ शकला.
लक्षात हे घ्यायचे की हे सारे त्याच्या लहान वयात घडलेले आहे. भारतात पूर्वी शिक्षण लहान वयात म्हणजे साधारणपणे आठवे लागले की सुरु करण्याची पद्धत असे. त्यामुळे ते मूल 'वयात येण्याच्या आत' त्याला दिल्या जाणाऱ्या विद्येत पारंगत झालेले असे. आज परिस्थिती उलटी आहे. आज तारूण्य आणि जीवनोपयोगी शिक्षण एकदम सुरू होते. ही गोष्ट मुळीच चांगली नव्हे. या नव्या व्यवस्थेत तारुण्याचा जोर जिंकतो व विद्या मागे पडते. हे अशासाठी सांगितले की व्यक्ती वयात येण्याच्या आधी व नंतर सारखी नसते - ह्या वस्तुस्थितीचा अर्जुनाच्या संदर्भात विचार केला तर इतर भावंडांच्या तुलनेत पुढे तो अधिक रसिक निघाला हे सांगता यावे. अर्जुन धनुर्धारी म्हणून जितका उत्तम तितकाच पुढे उत्तम प्रियकरही बनला. त्याचे चरित्र या गुणानेही नटलेले आहे. धर्मराजाने, कर्णाने, दुर्योधनाने या 'कलेला' जवळ केले नाही व एखाद्या मध्यमवर्गीय पापभीरू पुरुषाप्रमाणे संसार केला. अर्जुनाने मात्र ही बंधने स्वीकारली नाहीत. कारण तो योद्धा असला तरी तो एक अस्सल कलाकारही होता. प्रसंग आला तेव्हा तो बृहन्नडा झाला व नृत्यगायनाने लोकांचे रंजनही त्याने समर्थपणे करून दाखविले.
अशा विविध गुणांची खाण असलेला अर्जुन हा कलाकाराचे मन घेऊन जन्माला आला होता. कलाकाराचे मन आणि योद्ध्याचा पेशा हा विरोधाभास त्याने व त्याच्या शरीराने वयाच्या एका अवस्थेपर्यंत पेलला. योद्धा कणखर असायचा आणि कलाकार हळवा. इथे रणांगणावर त्याच्या हळव्या मनाने क्षात्रियवृत्तीवर मात केली व पराभवाच्या भीतीने त्याचे शरीर व मन मागे हटले. ही क्रिया इतकी वेगात घडली की आधी कोण पडले - मन की शरीर याचा निर्णय कधीही लागू नये. अर्जुनाने त्या क्षणी रणांगणावर जे काही भोगले ते म्हणून विशेष आहे. तो अयोग्य वेळी बोलला असेल, एक योद्धा-नायक या नात्याने ते चुकीचेही असेल पण हा मनोविकार त्यालाच होऊ शकला - बाकीचे ह्याच परिस्थितीत ठणठणीत का होते याचा हा असा उलगडा आहे.
ज्याचे मन दुबळे त्याला मनोविकार लवकर होणार. ज्याचे मन हळवे त्याचे मन लवकर दुबळे होणार. जो कलाकार त्याचे मन जन्मतः हळवेच असणार. अशांनी युद्धाच्या भानगडीत पडावेच कशाला? पण आपण नेमके कसे आहोत हे कळो येण्याच्या आत बालवयातच तो धनुर्धारी म्हणून नामांकीत झालेला होता. बाकीचे गुण त्याला 'नंतर' चिकटले. त्या गुणांमुळे तो आपले जीवन इतरांपेक्षा अधिक असोशीने जगला पण हा प्रसंग आला तेव्हा ते सारे जीवन या प्रपातात वाहून जाते की काय अशी परिस्थिती आली.
श्रीकृष्णासारखा सखा नसता तर त्याच्या नशिबी काय भोग आले असते त्याचे वर्णन पुढे यायचे आहे आणि ते प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला ऐकविणार आहे.
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1531304733800624&id=100007633369095&pnref=story
Comments
Post a Comment