श्री. हनुमंत उपरे यांनी ओबीसी हे नागवंशीय होत असा सिद्धांत मांडला आहे.

काही विषयांवर मत देणे अवघड असते. ओबीसी हा तसा एक नवा नाजूक विषय आहे. राजकारण्यांना आवडण्यासारखा आहे. काॅंगेसला तसाच रा. स्व. संघालाही आवडतो. याचे कारण ह्या वर्गाची प्रचंड संख्या व त्यांची हिंदुत्वावरील निष्ठा. हिंदुत्व म्हणजे काय - त्याचे भारतीयत्वात रूपांतर कसे करावे हा खरा विषय होता. तर त्यांचे जातीनिहाय तुकडे करायचा कार्यक्रम सरकार व 'समाजसुधारकांनी' राबविला व अनेक 'पुरोगामी' त्यात हौसेने सामील झाले. हे सारे प्रकरण आता धर्मांतरावर चालले आहे.
संघाला वाटते की येथे आधी हिंदु होते - ते मुस्लिम झाले - त्यांना परत बोलवावे. खरे तर ही न होणारी व अनावश्यक गोष्ट आहे.
याला प्रत्युतर कसे द्यावे याचाही विचार मग कोणीतरी करणारच. श्री. हनुमंत उपरे यांनी ओबीसी हे नागवंशीय बौद्ध होत असा सिद्धांत मांडला आहे. त्याबद्दल लिहिण्यास श्री. संजय सोनवणी समर्थ आहेत व ते त्याच्या पद्धतीने प्रतिवाद करीत आहेत.
श्री. सोनवणी यांनी भारतीयांत जे हिंदु म्हणवतात त्यांची वैदिक- अवैदिक अशी विभागणी करून अवैदिक तेच हिंदु अशी मांडणी चालवली. त्याला बरा प्रतिसाद मिळाला व मिळतो. कमी तुकडे करणारे असे सोनवणींचे मी वर्णन करीन.
आता हे नागवंशाचे प्रकरण आले आहे.
आपल्या इतिहासाची गंमत अशी आहे की मुळात काही लिहिलेलेच नसल्याने आपल्याला हवा तो सिद्धांत आधी ठरवून मग सिद्ध करायचा तर तसा पुरावा जमवता येतो. तो सिद्धांत खोडण्यासाठी मूळ सिद्धांत मांडणाऱ्याने जे प्रतिकूल म्हणून टाकलेले असते ते दुसऱ्याला मिळते व वाद छान वाढतो.
श्री. हनुमंत उपरे वा श्री. संजय सोनवणी या दोघांनीही आपल्याला हवी तशी मांडणी करावी. पण अशी करावी की ती खोडायची इच्छा असेल त्याला जीव मारावा लागेल. सहजी जमणार नाही.
सोबत श्री. उपरे यांचे लोकसत्तामधील पत्र दिले आहे. त्यातील एकदोन विधानांचे किती सहज खंडन करता येते ते पाहा.
कपडे शिवणारा शिंपी, लोखंडाची हत्यारे बनविणारा लोहार ही वर्णव्यवस्थेची उदाहरणे म्हणून त्यांनी दिली आहेत व विषय वादाला छान म्हणून लोकसत्तेनेही हे मांडायला त्यांना भरपूर जागा दिली आहे!
जात व वर्ण यांतील फरक उपरे यांना कोण समजावून सांगेल?
बौद्धकाळी वर्णव्यवस्था होती व कर्माने वर्ण मिळे - जातींचे प्रकरण बरेच नंतरचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे!
खरे काय असेल ते असो - ब्राह्मणांच्या शिरावर जातवर्णव्यवस्था व असमानता असे दोष थापायला सुरुवात झाली त्याची मजा दोनशे वर्षेही घेता आली नाही - कारण मूळ सिद्धांतच चुकीचा होता - आता ब्राह्मणांच्या हातून राजकीय सत्ता ओबीसींपर्यंत पोहोचली आहे तर एकदिलाने ती भोगायची. हे सोडून न उभी राहणारी वैचारिक मांडणी का करायची ह्याचे उत्तर मिळणार नाही.
आता म्हणतात ओबीसींनो आधी तुम्ही बौद्ध होतात - बौद्ध बना! हे संघाचेच म्हणणे झाले! मुस्लिमांनो, हिंदु होतात - हिंदु बना!
घरवापसीचा बावळट व आचरट प्रयोग थांबवा - सर्वांचा विकास कसा होईल ते बघा - असा इशारा ह्या नव्या प्रकाराने संघाला आणि सरकारला दिलेला आहे. तो या लेखाने अधोरेखित केला.

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).