Tuesday, August 28, 2012
महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार: धनगर-गवळी (भाग )

आपली पाळेमुळे जाणुन घेण्याची भावना प्रत्येकात असते. आपण मुळचे कोण, कोठुन आलोत आणि आपला आजचा वर्तमान हा असा का आहे हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात उठत असतात. परंपरागत समजुती दंतकथांचा अशा प्रश्नावर तोडगा म्हणुन फारसा उपयोग होत नाही. समाजशास्त्रीय पुरातत्वीय साधनांचा मात्र आपली पाळेमुळे शोधण्यासाठी अधिक उपयोग होत असतो.

महाराष्ट्राचा पुरातन इतिहास पाहिला तर मानवाचे आगमन या भुमीवर दोन-अडीच लाख वर्षांपुर्वीच झाले. तापी, गोदावरी, कृष्णा आदि नद्यांच्या काठांवर पुराष्म कालीन हत्यारांचे मोठे साठे मिळाले आहेत. अर्थातच हा शिकारी मानव होता टोळ्या करुन शिकारीच्या शोधात फिरता होता. सर्वच टोळ्या महाराष्ट्रात स्थिर झाल्या नाहीत. परंतु मानव जसा पशुपालक मानवही बनला तसा मात्र त्याची भटकंती -यापैकी थांबली. सरासरी चाळीस हजार वर्षांपुर्वी महाराष्ट्रात पशुपालन युग सुरु झाले. मानसाळवता येवू शकतील असे खाद्य पशुंची निवड करत त्यांचा जीवनयापनासाठी उपयोग करणे ही मानवाची निकड होती. शेळ्या-मेंढ्या, गायी-म्हशी-डुकरे यासारखे प्राणी कोंबड्या, शहामृगादि पक्षीही पाळण्यास सुरुवात झाली. यामुळे शिकारीसाठी अविरत भटकंती करण्याची गरज कमी झाली. हे पशुपालन करणारे लोक विविध मानवी समुदायांतुन आलेले होते. म्हणजे ते एकवंशीय नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग हा तसा पावसाच्या दृष्टीने शुष्क असल्याने काही सुपीक प्रदेश वगळता शेळ्या-मेंढ्यांचे पालन विपुल प्रमानात होवू लागले. दायमाबाद, इनामगांव, सावळदा, जोर्वे येथील विदर्भातील महापाषाणकालीन अवशेषांत शेळ्या-मेंढ्याचे मोठ्या प्रमाणावर अस्तित्व मिळुन आले आहे. त्या काळात मनुष्य स्वत:साठी पशुधनासाठीही कृत्रीम निवारे बनवत होता. आपले खिल्लार किंवा मेंढरांचे कळप घेवून चरवु कुरणांचा शोध घेत भटकणे सुरुच होते.

जवळपास वीस हजार वर्ष मनुष्य हा पशुपालक मानवच होता. जीवनोपयोगी अनेक शोध अद्याप लागायचेच होते. त्यामुळे एकच व्यवसाय असल्याने श्रमविभाजन असले तरी जाती/वर्ण बनण्याची सोय नव्हती. अद्यापही समाजव्यवस्था टोळी स्वरुपाचीच होती. सर्व समाज त्या काळात मातृसत्ताक पद्धती पाळत असे. उत्खननांत ज्याही प्रतिमा मिळाल्या आहेत त्या मातृदेवतांच्याच आहेत. एकार्थाने शक्ति पुजा ही सर्वात आधी सुरु झाली असे जे मानण्यात येते त्याला उत्खनित पुरावे दुजोराच देतात. महाराष्ट्रातील रेणुका, महालक्ष्मी, यल्लम्मा आदि देवतांची ठाणी याच पुरातन काळात कधीतरी निर्माण केली गेली.

पुढे शेतीचा शोध लागला. सरासरी पंधरा हजार वर्षांपुर्वी. ही शेती प्राथमिक स्वरुपाची होती. निम-भटक्या पशुपालकांना स्थिर होण्याची सोय या अत्यंत महत्वपुर्ण शोधाने केली. मनुष्य हा नद्या-ओढे, जलाशये यांचा जवळ वास्तव्यास येवू लागला. आपल्याला महाराष्ट्रात जेवढे पुरातत्वीय अवशेष मिळतात ते सर्व नद्यांच्याच खो-यांत आहेत. पशुपालक मानव हा तरीही काही हजार वर्ष निमभटका राहिला.  याचे कारण म्हणजे आपले पर्यावरण. पावसाळ्यात एकच पीक घेता येत असे. उर्वरीत काळ शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी घेवून जावे लागतच असे. पण नद्या-ओढ्यांना बांध घालुन अथवा विहिरे खोदुन शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यापरयंतची प्रगती जशी घदली तशी रब्बीची पीकेही तो घेवु लागला. येथे समाजाचे दोन भागांत विघटन झाले. एक वर्ग पुर्णतया शेतीकडे वळाला तर उर्वरेत आपल्या मुळ व्यवसायालाच चिकटुन राहिले. म्हणजे शेती तेही करत पण मुख्य साधन पशुपालन हेच राहिले.

थोडक्यात हे पशुपालक लोक आजच्या धनगर, गोपाळ शेतकरी (कुणबी) अन्य सर्वच जातींचे पुरातन पुर्वज होत असे म्हणायला प्रत्यवाय नाही. महाराष्ट्रात सनपुर्व दोन हजारापर्यंत महाराष्ट्र हा मुख्यत: धनगरांनीच व्यापला होता असे स्पष्ट दिसते. तोपर्यंत महाराष्ट्र अनेक जानपदांत विभागला गेला होता. गोपराष्ट्र, पांडुराष्ट्र, अश्मक, कुंतल आणि मल्लराष्ट्र असे महाराष्ट्रातील जानपदांचे उल्लेख महाभारतात येतात. महाराष्ट्र म्हणजे अनेक रट्ठांचा समुह. "राष्ट्र" हा शब्द मुळ प्राकृत "रट्ठ" या शब्दाचे संस्कृतीकरण आहे.  या जानपदांवरील सत्ता या प्राय: पशुपालकांच्याच होत्या. पशुपालकांची महत्ता शेतकरी समाजापेक्षा साहजिकच मोठी होती. महाराष्ट्रातील विराट राजा हा गोपालक होता. औंड्र सातवाहन हे धनगर होते. पुंड्रपुर उर्फ आजचे पंढरपुर हे धनगरांच्याच राज्याची राजधानी होते. मल्ल राष्ट्र हेही धनगरांचेच. खानदेश (कान्हदेश) येथे अहीर धनगर गोपाळांच्याच सत्ता होत्या. उत्तरेत नंदराजा हाही गोपाळ. माहाभारात बव्हंशी युद्धे ही पशुधन प्राप्तीसाठीच झालेली दिसतात. याचे कारण म्हणजे पशुधन हेच श्रेष्ठ धन आहे असे मानण्याचा प्रघात होता. ज्याचे पशुधन अधिक तो राजा असे मानण्याचा प्रघात होता. शेती व्यवसायाला अद्याप प्रतिष्ठा यायची होती.

धनगर हा शब्दच मुळात "धनाचे आगर" या अर्थाने वापरला गेला आहे.  आणि ते संयुक्तिकही होते कारण अखिल समाज अद्यापही बव्हंशी मांसाहारीच होता आणि ती गरज हाच समाज पुरवू शकत होता. पुढे या समाजातुन लोकरीपासुन वस्त्रे कांबळी विणन्याची कला प्रगत झाली. त्यांची आर्थिक भरभराट व्हायला या कलेनेही हातभार लावला. स्वाभाविकपणे जे या व्यवसायाला चिकटुन राहिले त्यांची स्वतंत्र पोटजातच पडली. अशा रितीने पोटविभाजन होत कालौघात आधी बारा तर आता जवळपास बावीस पोटजाती धनगर समाजात पडल्या आहेत. मुळचे आपण सारेच एक होतो हे भान हा समाज आता पुर्णपणे विसरला आहे.

जसजसे पुढे अनेक मानवोपयोगी शोध लागु लागले तसतसे याच समुदायातील लोक त्यात्या व्यवसायांत पडु लागले. मग ते सुतार असतील कि लोहार. सोनार असतील कि चर्मकार. गवंडी असतील कि वडारी, वाणी असतील कि वंजारी....हे व्यवसाय निष्ठ विभाजन होत गेले. आद्य पुरोहित वर्ग पंधरा-वीस हजार वर्षांपुर्वीच याच समुदायातुन निर्माण झाला हे समाजशास्त्रीय वास्तवही येथे विसरता येत नाही.

दैवते धर्मश्रद्धा:

धनगर असोत कि गवळी, हे समुदाय शैव आहेत. ते नुसते शैवच आहेत असे नव्हे तर त्यांच्या काहे महान पुर्वजांना त्यांनी दैवत प्रतिष्ठा दिल्याचेही आपल्याला इतिहासात डोकावून पाहिले तरी स्पष्ट दिसते. पौंड्र धनगरांनी दक्षीण महाराष्ट्र व्यापला. पुंड्रपुर (आजचे पंढरपुर) ही त्यांची राजधानी होती. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला जातो. (पहा-विट्ठलाचा नवा शोध -संजय सोनवणी.). अहिर धनगरांपैकी इश्वरसेन राजाने इसवी सनाच्या तिस-या शतकात आपली सत्ता निर्माण केली होती ती दीद्शे वर्ष टिकली हेही लक्षात घ्यावे लागनार आहे.

खंडोबा हे लोकदैवत असुन नंतर त्याचे मार्तंड-भैरव वा शिवाशी नाते जुळवले गेले असे सोंथायमर ते डा. रा, चिं. ढेरे सांगतात. पण हे मुळचे वास्तव नाही. धनगर (औंड्र/पुंड्र/अहिर .) हे सारेच मुळचे शिवपुजक आहेत. सातवाहन घराण्यात स्कंद (हे संस्क्रुतीकरण आहे...मुळ नाव खंड...त्याच्या काही नाण्यांवर फक्त खद असेही लिहिलेले आहे...कदाचित अनुस्वार कालौघात अस्पष्ट झाला असेल.) हा सम्राट .. १५६ मद्धे होवुन गेला. त्याने मल्ल राष्ट्र जिंकुन आपल्या अधिपत्याखाली आणले म्हणुन तो मल्हारीही (मल्ल रट्ठ हरवणारा म्हणुन मल्ल-हारी) बनला. हाच राजा जेजुरीचा खंडेराय म्हणुन पुज्य बनला एवढे पुरावे आता समोर येत आहेत. धनगर राजे आपापसातही युद्धे करत असत, अन्यायी सत्ता उलथुन टकत असत. कालौघात याच महापुरुषांचे दैवतीकरण केले गेले एवढेच. खंडोबा ही एक ऐतिहासिक व्यक्ती होती असे डा. रा. चिं. ढेरे सोंथायमर यांनीही नमुद करुन ठेवले आहे.

परंतु सर्वच महाराष्ट्र मुळात एकाच समुदायातुन विभक्त झाला असल्याचे वास्तव जनस्मृतींत कायम असल्याने खंडोबा आणि श्रीविट्ठल ही सर्वच जातीजमातींची कुलदैवते बनली हे वास्तव आपण विसरु शकत नाही. आजच्या सर्वच मानवी समाजांचे मुळ हे पशुपालक समुदायांत आहे हे या निमित्ताने लक्षात यावे. त्यामुळे जाती-जातींतील अकारणचे दुराग्रह अत्यंत अयोग्य आहेत हे आपल्याला समजावुन घ्यावे लागनार आहे.येथे एकच उदाहरण पुरेसे आहे. अहिर हे जसे धनगर समाजात आहेत तसेच ते सोनार, शिंपी, कोळी, सुतार, आगरी, मराठा अशा समाजांतही आहेत. गुजर पशुपालकांबाबतही आपण असेच पाहु शकतो. याचाच अर्थ असा कि एकच समुदाय व्यवसायनिष्ठतेने विभागला गेला पण मुळ हे एकच होते.

जवळपास तेराव्या शतकापर्यंत राष्ट्रकुट, भोज, कदंब, यादव अशा सत्तांच्या रुपाने पशुपालकांच्या सत्ता महाराष्ट्राच्या बव्हंशी भागात कायम राहिल्या. महाराष्ट्री संस्कृतीची त्यांनी अगत्याने जोपासना केली. महाराष्ट्री भाषेला भरभक्कम आधार दिला. गड-किल्ले यांच्या उभारण्या त्यांच्याच काळातल्या. बौद्ध शैव लेण्यांची निर्मितीही त्यांच्याच काळातली. महाराष्ट्रातील आर्थिक भरभराट जी झाली तेही याच काळात.

पण याच काळात अनेक उद्योग व्यवसाय निर्माण झाल्याने समाज जातीविखंडितही होवू लागला. आपले मुळ विसरत नवीन अभिमान  निर्माण होवू लागले. मुळ पशुपालन व्यवसायाला मुलभुत प्रेरणेने जे चिकटुन राहिले ते समाजिक परिप्रेक्ष्यात मागे पडु लागले. वर्णव्यवस्थेचा पगडा पडु लागला. हे सर्वांबाबतच होवू लागले. कोणीही असो, त्याचे पुरातन मुळ हे याच पशुपालक समाजात आहे हे भान हरपले. आणि तेथेच धनगर-गवळ्यांचीच काय सर्वच समाजांची अधोगती सुरु झाली. तेराव्या शतकानंतरचा धनगरांच्या इतिहासाचा नवाच अध्याय सुरु होतो. ते पुढील भागात!

-
संजय सोनवणी
९८६०९९१२०५ 


महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार: धनगर-गवळी (भाग )




Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).

List of Hatkar clans